बोधकथांचे फलक ठरले शेतकऱ्यांचे आकर्षण

By Admin | Updated: April 19, 2016 00:36 IST2016-04-18T23:06:41+5:302016-04-19T00:36:10+5:30

मालेगाव : अपर जिल्हाधिकारी कार्यालय झाले बोलके

The peculiarity of the story is the attraction of the peasantry | बोधकथांचे फलक ठरले शेतकऱ्यांचे आकर्षण

बोधकथांचे फलक ठरले शेतकऱ्यांचे आकर्षण

 शफीक शेख मालेगाव
सर्वसामान्य शेतकऱ्यांना ग्रामीण भागात शेतीच्या अनेकविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. शेतीचे वाद, भांडण-तंटे यामुळे ते वैतागतात. यातून मार्ग काढण्यासाठी कुणी मदत करीत नाही; परंतु सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत गोष्टीरूपाने मालेगावी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या ‘पोस्टर्स’द्वारे समजावून सांगण्यात आले असून, ‘अपर जिल्हाधिकारी कार्यालय’ बोलके झाले आहे.
मालेगावी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतीच्या अनेक ‘केसेस’मध्ये गुरफटलेले शेतकरी तोडगा काढण्यासाठी येत असतात. त्यावेळी बराचवेळ त्यांना कार्यालयाबाहेर व्हरांड्यात ताटकळत उभे राहावे लागते.
यावेळी अशा शेतकऱ्यांचा वेळ ‘कारणी’ लागावा व त्यांना कुणी फसवणार नाही. याबाबत माहिती करून देण्याचा प्रयत्न अपर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांनी केला असून, त्यांचे कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ‘गोष्टी’ रूपाने त्यांचे प्रश्न सोडवून दाखविण्यात आले आहेत. त्यात शेतीचे जे कायदे आहेत त्यातील कूळ कायदा, सिलिंग कायदा, आदिवासी जमिनीचा कायदा, जमीन खरेदी-विक्री व्यवहार कायदा आदि विविध कायद्यांची माहिती देण्यात आली आहे.
अज्ञानामुळे शेतकरी फसविला जातो. त्याची लुबाडणूक टळावी हा त्यामागील उद्देश आहे. शेतीच्या कायद्याची माहिती अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत देण्यात आली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी कथा लिहून हा प्रयोग सांगलीत केला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने अपर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांनी ही बाब महा राजस्व अभियानात समाविष्ट केली.
सुमारे ५० शेतकरी रोजच शेतीच्या केसेससाठी मालेगावी अपर जिल्हाधिकारी कचेरीत येत असतात. केस सुरू असताना काही शेतकरी बाहेर बसून असतात. कायदेविषयक ४५ फलक येथे लावण्यात आले असून, त्याचा प्रभावी वापर होत आहे. पुस्तक आणि पत्रकांपेक्षा या फलकांमुळे शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यात यश आले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रथमच मालेगावी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. याची परिसरात चर्चा होत आहे.

Web Title: The peculiarity of the story is the attraction of the peasantry