वीज लोकअदालतीत ७६ लाखांचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:41 IST2019-12-17T00:40:32+5:302019-12-17T00:41:35+5:30
खंडित वीजपुरवठा, वीजचोरी तसेच न्यायालयात विविध कारणांनी दाखल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ग्राहकांना तडजोडीची संधी मिळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत १०७२ ग्राहकांनी ७६ लाखांचा भरणा केला आहे.

वीज लोकअदालतीत ७६ लाखांचा भरणा
नाशिक : खंडित वीजपुरवठा, वीजचोरी तसेच न्यायालयात विविध कारणांनी दाखल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ग्राहकांना तडजोडीची संधी मिळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत १०७२ ग्राहकांनी ७६ लाखांचा भरणा केला आहे.
शनिवारी (दि.१४) नाशिक व नगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये ७६ लाख ८६ हजार रु पयांचा भरणा करून सदर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेले व वीजचोरी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. मालेगाव मंडळातील ३७८ दाव्यांमध्ये ग्राहकांनी तडजोड करीत ३० लाख ९६ हजाराचा भरणा केला. नाशिक शहर मंडळातील ४६ दाव्यामध्ये ५ लाख ८९ हजार भरणा केला, तर अहमदनगर मंडळाने ६४८ दाव्यांमध्ये ४० लाख १ हजार रुपयांचा भरणा अशी एकूण १०७२ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली.
लोकअदालतीमध्ये विनाविलंब न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच परस्पर समन्वयासाठी सदर लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते प्रवीण दरोली, रमेश सानप आणि संतोष सांगळे, वरिष्ठ व्यवस्थापक डी. आर. मंडलिक, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, बाळासाहेब कराड, व्यवस्थापक किरण बिरारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
न्यायालयाचे मार्गदर्शन
सदर लोकअदालतीसाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश आर. एम. जोशी, मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एच. मोहम्मद, अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. एल. अणेकर, निफाड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जी. वाघमारे, पी. डी. डिग्रसकर व एस. टी. डोके तसेच नाशिक व अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. पी. कुलकर्णी व एस. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.