पेस्ट कंट्रोल ठेक्याला अटी-शर्तींची मेख
By Admin | Updated: January 16, 2015 23:50 IST2015-01-16T23:49:59+5:302015-01-16T23:50:20+5:30
कठोर नियमावली : येत्या महासभेत मान्यतेसाठी येणार

पेस्ट कंट्रोल ठेक्याला अटी-शर्तींची मेख
नाशिक : धूर व औषध फवारणी तथा पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला गेल्या वर्षभरात तेरा वेळा मुदतवाढीचा प्रश्न वादग्रस्त ठरल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नव्याने ठेका देण्यासंबंधी निविदा प्रक्रिया राबविताना कठोर नियमावली तयार करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. सदर नियमावलीचे कामकाज अंतिम टप्प्यात असून, येत्या महासभेत ती मान्यतेसाठी ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने पेस्ट कंट्रोलबाबत नवी मुंबईच्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर आता सुरत शहरातील कामकाजाची पाहणी करण्याचे ठरविले आहे.
शहरात डेंग्यूने थैमान घातले त्यावेळी डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांसह सदस्यांकडून वाढल्या होत्या. महापालिकेने पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराला मुदत संपल्यानंतर कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता वर्षभरात तब्बल तेरा वेळा मुदतवाढ दिली होती.
या मुदतवाढीला सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवित नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी महासभांमध्ये केली होती. याशिवाय आयुक्तांनी स्थायी समिती व महासभांवर सदरचा मुदतवाढीचा प्रस्ताव न आणता परस्पर बिले अदा करण्यालाही विरोधी पक्षनेत्यासह सदस्यांनी आक्षेप घेतला होता. मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समिती सभेतही पुन्हा मुदतवाढ देण्यास सभागृहाने विरोध दर्शविला होता आणि पंधरा दिवसांत नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची सूचना केली होती.
पेस्ट कंट्रोलबाबत सदस्यांच्या असलेल्या तीव्र भावना आणि एकूणच राबविली जाणारी प्रक्रिया लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी निविदा प्रक्रियेसाठी नियमावली बनवताना कठोर अटी-शर्ती टाकण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने नियमावली तयार केली असून, ती येत्या महासभेवर मान्यतेसाठी ठेवली जाण्याची शक्यता आहे.
नियमावलीत प्रामुख्याने संबंधित ठेकेदाराला जीपीएस यंत्रणा बंधनकारक करण्यात आली असून, दंडाची तरतूद वाढविण्यात आली आहे. याशिवाय जीपीएस यंत्रणेद्वारे लॉगबुक भरल्याशिवाय ठेकेदाराला बिल अदा होणार नाही, आदिंसह काही अटी-शर्तींची मेख मारून ठेवण्यात आली. त्यामुळे निविदा दाखल करणाऱ्या ठेकेदारावर पूर्ण नियंत्रण महापालिकेचे असणार आहे. (प्रतिनिधी)