प्रवाशांना सोसावा लागतो फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:34+5:302021-02-05T05:39:34+5:30
कोरोनामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चार महिने सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे हे बंद होत्या. ...

प्रवाशांना सोसावा लागतो फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेचा भुर्दंड
कोरोनामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चार महिने सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे हे बंद होत्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हळूहळू कोविड व फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे सुरू केल्यात. कोविड स्पेशल रेल्वेला नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारणी केली आहे. मात्र फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेला तत्काळचे भाडे आकारले जात आहे. तसेच सर्वसाधारण तिकीट बंद असून आरक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच मासिक पास, ज्येष्ठ नागरिक व इतर घटकांच्या सवलती बंद करण्यात आल्या आहेत. दिव्यांग, मूकबधिर, कॅन्सरग्रस्त फक्त यांनाच रेल्वेने सवलत दिली आहे.
आरक्षण तिकीट कन्फर्म असेल तरच प्रवासी प्रवास करू शकतो. आरक्षण तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल तर ज्या रेल्वेस्थानकावरून प्रवासी बसणार होता, त्या रेल्वे स्थानकावर येणारी संबंधित रेल्वे येण्याच्या ३० मिनिट अगोदर वेटिंग लिस्टमधील तिकीट रद्द करावे लागते. तिकीट रद्द करताना कमीत कमी साठ रुपये कपात केली जाते. रेल्वे येण्याच्या अर्धा तासानंतर म्हणजेच २९ मिनिटापासून वेटिंग लिस्ट तिकीट रद्द न केल्यास त्या प्रवासाला कुठलाच रिफंड मिळत नाही. आरक्षण काढताना प्रवाशांना ज्या गावाला जायचे आहे येथील पूर्ण पत्ता दिल्याशिवाय आरक्षण मिळत नाही.
पॅसेंजर व आजूबाजूच्या जिल्ह्यात जाण्यासाठी काही महत्त्वाच्या असलेल्या एक्सप्रेस अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांना जास्त भाडे सोसावे लागत आहे. सर्वसाधारण तिकीट काढले तरी आरक्षण काढावेच लागते तसेच सुपरफास्ट चार्जदेखील भरावा लागतो. पंचवटी एक्सप्रेसने नाशिक रोडवरून मुंबईला जाणारे पासधारक यापूर्वी ६१० रुपयात महिनाभर जाऊ शकत होते. मात्र आता मासिक पासची सवलत बंद असल्याने नाशिक रोडवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशाला दररोज येण्या-जाण्यासाठी २१० रुपये खर्च करावे लागत आहे. पॅसेंजर गाडीने नाशिक रोड वरून इगतपुरीला जाण्यासाठी सर्वसाधारण डब्यात यापूर्वी प्रवाशाला पंधरा रुपयांचे तिकीट काढावे लागत होते. मात्र आता त्या प्रवासाला फेस्टिवल स्पेशल रेल्वेतून दुप्पट- तिप्पट भाडे आकारून प्रवास करावा लागतो. गोदावरी एक्सप्रेस, मनमाड-पुणे हुतात्मा एक्सप्रेस, देवळाली-भुसावळ, इगतपुरी-भुसावळ, मुंबई-भुसावळ, मनमाड-इगतपुरी पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांची फार मोठी गैरसोय होत आहे.
अप-डाऊनमार्गे एकूण ५० रेल्वे सुरू
नाशिक रोडमार्गे यापूर्वी दररोज २९ व आठवड्यातील काही दिवस धावणाऱ्या रेल्वे पकडून अप-डाऊन मार्गे एकूण ८० रेल्वे धावत होत्या. मात्र आता स्पेशल व कोविड स्पेशल रेल्वे एकूण अप-डाऊन मार्ग एकूण ५० रेल्वे धावत आहेत.
प्रतिक्रिया====
मासिक पास ज्येष्ठ नागरिक सवलत व इतर सवलत रेल्वेने बंद केल्याने प्रवाशांना जास्त दराने तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे. व्यवसाय, नोकरी व इतर कामासाठी मुंबई-ठाण्याला दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. तसेच अनेक महत्त्वाच्या काही एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना आरक्षणासोबत सुपरफास्ट चार्जचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- राजू फोकणे
मुंबई पासधारक प्रवासी संघटना
-------
रेल्वेमध्ये प्रवास करताना आरक्षण सक्तीचे केल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरक्षणाच्या खर्चासह ऐनवेळी तिकीट कन्फर्म न झाल्यास तिकीट रद्द करताना पैसे कापले जातात. त्यामुळे सर्वप्रकारे फायदा रेल्वेचा होत आहे. प्रवाशांना मात्र मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने पूर्वीसारखी सवलत प्रवाशांना सुरू करण्याची गरज आहे.
प्रा. किरण बोरसे, रेल्वे प्रवासी