प्रवासी वाहतूक बंद असल्याने एसटीत कर्मचाऱ्यांची उपस्थिती जेमतेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:14+5:302021-05-08T04:14:14+5:30
नाशिक जिल्ह्यातील एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असून, फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणुकीच्या ठिकाणाहून ने-आण करण्यासाठी ...

प्रवासी वाहतूक बंद असल्याने एसटीत कर्मचाऱ्यांची उपस्थिती जेमतेम
नाशिक जिल्ह्यातील एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असून, फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणुकीच्या ठिकाणाहून ने-आण करण्यासाठी दोन ते तीन टक्के एसटी बसेस सुरू आहेत. दिवसातून दोन ते तीन फेऱ्या ठरावीक अंतराने चालविल्या जात असून, प्रवासी क्षमताही शासनाने ठरवून दिल्यानुसार केली जात आहे. शासनाने सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांना १५ ते ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवणे बंधनकारक केले असल्याने एसटीच्या चालक-वाहकांना परिस्थितीनुरूपच कामावर बोलविले जात आहे. तर प्रशासकीय कामकाज करणाऱ्या कार्यालयीन कर्मचारी, अधिकाऱ्यांना रोटेशननुसार एक दिवसाआड १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम केले जात आहे.
-----------
जिल्ह्यातील आगार - १२
चालक- २,१२२
वाहक- १,९००
यांत्रिकी कर्मचारी- ९००
प्रशासकीय अधिकारी-६१२
अधिकारी- ११३
-----------------
प्रशासकीय कामकाज १५ टक्क्यांवर
एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक बंद केल्याने चालक-वाहकांना गरजेनुसार कामावर बोलाविले जात आहे. प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे साहजिकच प्रशासकीय कामकाजही कमी झाले आहे. नियमित अत्यावश्यक कामे करण्यासाठी, कार्यालयीन कामकाजासाठी १५ टक्के कर्मचाऱ्यांना बोलविले जात आहे.
------------
चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया
प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे चालक-वाहकांना सध्या घरीच आराम आहे. अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करताना मात्र चालकांना बोलाविले तर जावे लागते. कोरोनाचे नियम पाळूनच वाहतूक केली जात आहे.
- प्रशांत जाधव, चालक
----------
मध्यंतरीच्या काळात एसटी चालक-वाहकांना मुंबई शहरात ड्यूटी दिल्यामुळे अनेकांना कोरोनाची बाधा झाली. मात्र आता सर्वच ठिकाणी प्रवासी वाहतूक बंद केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे, मात्र अत्यावश्यक सेवेसाठी ड्यूटीवर जावे लागते.
- सोमनाथ निकम, वाहक
------------------
शासनाने दिलेल्या आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांची फक्त १५ टक्के उपस्थिती असते. कार्यालयीन कामासाठीदेखील हाच निकष असून, अत्यावश्यक कामांसाठी मात्र कर्मचाऱ्यांना रोटेशननुसार मोजक्याच उपस्थितीत काम करावे लागत आहे.
- राजेंद्रकुमार पाटील, विभाग नियंत्रक