पक्ष गळतीत मनसे राज्यात आघाडीवर?
By Admin | Updated: January 26, 2017 00:34 IST2017-01-26T00:33:45+5:302017-01-26T00:34:06+5:30
कॉँग्रेसमध्ये गुलजार दाखल : प्रवेश करता क्षणीच मिळाली उमेदवारी

पक्ष गळतीत मनसे राज्यात आघाडीवर?
नाशिक : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या पक्षांतरामुळे अनेक पक्षांना गळती लागली आहे. तथापि, नाशिक महापालिकेत चाळीस पैकी तब्बल २८ नगरसेवकांनी ‘मनसे’ला सोडचिठ्ठी दिली असून, बहुधा राज्यात सर्वाधिक गळती लागलेला मनसे हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरावा अशी स्थिती आहे. या पक्षाचे नगरसेवक गुलजार कोकणी यांनी कॉँग्रेस मध्ये प्रवेश केला असून, आता मनसेचे केवळ १२ नगरसेवक शिल्लक आहेत. विशेष म्हणजे कोकणी यांच्या प्रवेशाने कॉँग्रेसला एका प्रभागात उमेदवार मिळाला असून, पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी यादी होण्याच्या आतच कॉँग्रेसच्या शहराध्यक्षांनी कोकणी यांची उमेदवारी घोषित केली आहे. मनसेला सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पंधरा दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये काही प्रकल्पांचे लोकार्पण केले आणि त्यामुळे वातावरणात बदल होईल असा दावा केला. परंतु तसे घडले नाही. उलट गुलजार कोकणी यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. गुलजार कोकणी यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी भाई जगताप, नाशिकचे पालक असलेले विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील आदि उपस्थित होते. मनसेतून दाखल ंझालेल्या कोकणी यांच्यामुळे कॉँग्रेसलाही मोठा आधार मिळाला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधून वसंत गिते यांचे चिरंजीव प्रथमेश गिते भाजपाकडून इच्छुक असून, त्यांच्या विरोधात गुलजार कोकणी यांना थेट उमेदवारीच जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)