पंढरपूर सायकलवारीतील सायकलिस्ट
By Admin | Updated: July 15, 2016 00:54 IST2016-07-15T00:47:23+5:302016-07-15T00:54:52+5:30
नाशकात परतलेविठू नामाचा गजर : तीन दिवसांत पूर्ण केले ३५० कि.मी.चे अंतर पार

पंढरपूर सायकलवारीतील सायकलिस्ट
नाशिक : विठू नामाचा जयघोष करत मजलदरमजल करत नाशिकहून निघालेले सायकलिस्ट रविवारी (दि.१०) पंढरपूरला पोहोचले. नाशिक सायकलिस्टतर्फे काढण्यात आलेल्या या सायकलवारीत ४०० हून अधिक सायकलिस्ट सहभागी झाले होते. नाशिकसह पुणे, मुंबई, औरंगाबाद आदि ठिकाणांहून सायकलिस्ट या सायकलवारीत सहभागी झाले होते.
या सायकलवारीला मोठ्या उत्साहात नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून सुरुवात करण्यात आली. पंढरपूरकडे मार्गक्रमण करताना मुखी विठूचे नाम तसेच वाटेतून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या आणि ये-जा करणारी वाहने यातून मार्ग काढत हे सायकलिस्ट रविवारी पंढरपूरमध्ये दाखल झाले. नाशिकहून निघालेल्या या सायकलवारीत सिन्नर आणि संगमनेर येथूनही सायकलिस्टने सहभाग नोंदवला.
आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या नाशिकसायकलिस्टने राबविलेल्या उपक्रमाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या सायकलवारीत वीस महिलांसह १५ लहान मुले आणि मुलींचादेखील सहभाग दिसून येत होता.
नाशिक शहरात सायकल चालवण्याकडे कल वाढत आहे. ही सायकलवारी यशस्वी करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी, हरिष बैजल, हितेंद्र महाजन यांच्यासह प्रसाद गर्भे, वैभव शेटे, संदीप जाधव, दत्तू आंधळे, मिलिंद धोपावकर, किशोर काळे यांच्यासह नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)