पंचवटी विभागात मातब्बर उतरणार रिंगणात
By Admin | Updated: January 3, 2017 01:39 IST2017-01-03T01:38:56+5:302017-01-03T01:39:11+5:30
मनपा निवडणूक : माजी आमदार, खासदार पुत्रांसह महापौर, पक्ष पदाधिकाऱ्यांना पालिकेत रस

पंचवटी विभागात मातब्बर उतरणार रिंगणात
पंचवटी : मनपा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने पंचवटी विभागातील इच्छुक उमेदवारांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. अद्याप पॅनल निर्मिती, उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नसली तरी येणारी महापालिका निवडणूक ही आमदार, महापौर, उपमहापौर तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणारी आहे. मनपा निवडणुकीत आमदार पुत्र, विद्यमान महापौर, विद्यमान उपमहापौर तसेच माजी खासदार पुत्र हेदेखील पुन्हा एकदा ताकद आजमाविण्याचा प्रयत्न करणार असल्याने पंचवटीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
पंचवटीत नवीन रचनेनुसार सहा प्रभागांची निर्मिती झाली आहे. प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे आता २४ सदस्य असणार आहेत. पंचवटीत भाजपा शहर अध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप हे येत्या निवडणुकीत मुलगा मच्छिंद्र यास निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपाची सत्ता आल्यास त्याच्या गळ्यात महापौरपदाची माळ कशी पडेल, यासाठी धडपड करीत आहेत. पूर्वीचे ३, १० व ११ हे प्रभाग मिळून प्रभाग ३ ची रचना करण्यात आली आहे. मनसेचे विद्यमान महापौर अशोक मुर्तडक यांचा नव्याने प्रभाग ६ झाल्याने ते पुन्हा नशीब आजमावित आहेत. आमदार, महापौर, उपमहापौर व मनसे पदाधिकारी हे सर्वच पंचवटीतील असल्याने मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.