नाशकात पालेभाज्या तेजित : आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:59 IST2019-07-01T17:59:26+5:302019-07-01T17:59:52+5:30
नाशिक बाजारसमितीतून सध्या मुंबई व उपनगरात मोठया प्रमाणात पालेभाज्या मालाची निर्यात केली जात आहे. पुणे, खेड तसेच मंचर या भागातील कोथिंबीर मालाची आवक घटली आहे.

नाशकात पालेभाज्या तेजित : आवक घटली
नाशिक : पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा विशेष असा कोणताही परिणाम पालेभाज्यांच्या उत्पादनावर झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांची आवक घटलेली असल्याने बाजारभाव तेजित असल्याचे दिसून येते. काल रविवारी (दि.३०) कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी आलेल्या सर्वच पालेभाज्यांना चांगला बाजारभाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
काल मेथी जुडी ७८ रूपये दराने विक्री झाली तर कांदापात ५६, शेपू जुडीला ४० रूपये असा बाजारभाव मिळाला होता. शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने त्यातच परजिल्हयातील स्थानिक बाजारसमितीत शेतमालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजित आले आहेत. नाशिक बाजारसमितीतून सध्या मुंबई व उपनगरात मोठया प्रमाणात पालेभाज्या मालाची निर्यात केली जात आहे. पुणे, खेड तसेच मंचर या भागातील कोथिंबीर मालाची आवक घटली आहे. परवा शनिवारी (दि.२९) मुंबई बाजारात १५० रूपये प्रति जुडी असा बाजारभाव मिळाला तर नाशिक बाजारसमितीत १४० रूपये दराने कोथिंबीरची विक्री झाली होती. काल रविवारी कोथिंबीरला १०० रूपये असा बाजारभाव मिळाला.
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल ओला व सुकलेला असला तर त्या मालाला समाधानकारक बाजारभाव मिळत नाही या उलट कोरडा शेतमाल असेल तर त्याला योग्य व उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याचे बाजारसमितीतील भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले. आगामी कालावधीत पावसाचा जोर वाढल्यास पालेभाज्यांची आवक घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालेभाज्यांचे दर तेजित असल्याने सध्या तरी ग्राहकांना पालेभाज्या खरेदीसाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.
,