Palanquin procession to Sri Krishnanagar | श्रीकृष्णनगरला पालखीची मिरवणूक

श्रीकृष्णनगरला पालखीची मिरवणूक

पंचवटी : श्रीकृष्णनगर येथील कृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवारी मध्यरात्री कृष्णजन्माष्टमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कृष्ण जन्मानंतर शेकडो उपस्थित भाविकांनी कृष्ण भगवान की जय हो, राधे-कृष्णा गोपाळ-कृष्णा जयघोष करत दर्शनाचा लाभ घेतला. फुलांनी सजविलेल्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात येऊन जन्म साजरा करण्यात आला. त्यानंतर फटाके फोडून पेढे वाटप करण्यात आले.
श्री कृष्णजन्माष्टमीनिमित्ताने शनिवारी सायंकाळी श्री कृष्णनगर कृष्णमंदिर येथून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीत कृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली होती. कृष्णमंदिर येथून निघालेली पालखी टकलेनगर, कृष्णनगर उद्यान, गणेशवाडी भागातून काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. पालखीचा कृष्णमंदिरात समारोप करण्यात आला. शनिवारी सकाळी श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले. सायंकाळी गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम झाला. रात्री महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक मच्छिंद्र सानप, श्रीकृष्ण महाशद्बे आदींसह शेकडो भाविक उपस्थित होते.
गेल्या मंगळवारपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली होती. दोन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. गुरुवारी अन्नकोट प्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी शेकडो भाविकांनी लाभ घेतला, तर शुक्रवारी सकाळी ७ वाजता पवमान अभिषेक, श्रींची महापूजा व आरती, गीत पाठ, रात्री हरिप्रिया कृष्णलीला धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Web Title:  Palanquin procession to Sri Krishnanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.