आठ कारखान्यांच्या मालकांना फिरावे लागतेय दारोदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:08+5:302021-07-24T04:11:08+5:30
सहा सहकारी आणि दोन खासगी, असे आठ साखर कारखाने असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुसऱ्यांच्या दारात जाऊन आमचा ...

आठ कारखान्यांच्या मालकांना फिरावे लागतेय दारोदार
सहा सहकारी आणि दोन खासगी, असे आठ साखर कारखाने असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुसऱ्यांच्या दारात जाऊन आमचा ऊस घ्या म्हणून विनवणी करावी लागत आहे, ही जिल्ह्यातील सहकार धुरिणांची शोकांतिका आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अपवाद फक्त कदवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांचा. निसाका, रासाका, वसाका, नासाका, कादवा, गिरणा या सहा सहकारी कारखान्यांबरोबरच द्वारकाधीश आणि रावळगाव हे दोन खासगी साखर कारखाने यामुळे एकेकाळी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून यायचा; पण आजची स्थिती त्या उलट झाली आहे. एकटा कादवा सोडला, तर एकही सहकारी साखर कारखाना सुरळीत सुरू नाही. रावळगाव कारखान्याकडेही शेतकऱ्यांचे पैसे थकल्यामुळे तो बंद आहे. आपले हक्काचे कारखाने बंद झाले असल्याने आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. कारखाने बंद व्हायला जबाबदार कोण किंवा ते कशामुळे बंद झाले, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे; पण त्यामुळे आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेली स्थिती भयंकर आहे. वावरात उभा असलेला ऊस हंगामात आडवा होईल की नाही, या चिंतेने आजच अनेकांना झोप येत नाही. जे ऊस लागवडीकडून भाजीपाल्याकडे वळाले त्यांनाही कोरोनामुळे दराचा फटका बसला आहे. परजिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस नव्हता तोपर्यंत त्यांनी आपल्या जिल्ह्यातील ऊस घेतला; पण आता तेही नकार देऊ लागले असल्याने जिल्ह्यातील कारखाने सुरू होणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते. धाराशीवमुळे वसाकाचा प्रश्न काही अंशी तरी मार्गी लागला आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या पतसंस्थेच्या पाठबळाणे लवकरच रासाकाची चाके फिरण्याची आशा निर्माण झाली आहे, तर नासाकासाठीही ई-निविदा निघणार असल्याने सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निसाकाचा प्रश्न कायम आहे, तर गिसाकाचे प्रकरण वेगळे आहे. कारखाना कोण चालावयास घेतो याला सभासदांच्या लेखी महत्त्व नाही, तर कारखान्याची चाके फिरणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन आपला कारखाना चालविण्यापेक्षा आपणच थोडी हिंमत दाखविली, तर ते सहज शक्य आहे, हे कादवाच्या रूपाने श्रीराम शेटे यांनी दाखवून दिले आहे. इतरांप्रमाणेच कादवाही आर्थिक अडचणीत होता; पण काटकसरीचे धोरण राबवून त्यांनी बाराशे मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना आज अडीच हजार मेट्रिक टनांपर्यंत नेला आणि शेतकऱ्यांना भाव देत नवा आदर्श घालून दिला आहे. आता नासाकासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, ते फळाला यावेत, हीच सभासदांची भावना आहे.
-संजय दुनबळे