अशक्तपणावर अशी करा मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:57+5:302021-05-10T04:14:57+5:30
नाशिक : कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एकदा तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी ...

अशक्तपणावर अशी करा मात
नाशिक : कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एकदा तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खावी आणि एक ग्लास नारळपाणी प्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जात आहे. कोरोना झाल्यानंतर त्याच्याविरुध्द लढण्यासाठी आपल्या शरिरातील बरीचशी ऊर्जा खर्च झालेली असते. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना अशक्तपणा जाणवतो. हातपाय दुखणे, पोटऱ्या दुखणे, काहीच करण्यासाठी फारसा उत्साह नसणे अशी काही लक्षणे दिसतात. हे सर्व अशक्तपणामुळे होत असते. कोरोनाशी लढताना खर्ची पडलेली ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी रुग्णांनी संतुलित आहार घेण्याची गरज असते. यासाठी रोजच्या जेवणात एकवेळ तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खावी, दिवसभरात किमान चार ते पाच ओले काळे खजूर खायला हवेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसातून एकदा अंजीर आणि किसमिसचा ज्यूस घ्यावा, यामुळे नैसर्गिकरित्या शरिरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. कोरोना अथवा कोणताही आजार असो, या काळात आपल्या पेशी कमी होत असतात. यासाठी आपल्या आहारात प्रोटीन वाढविणारे अन्नघटक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सकाळी नाष्ट्यामध्ये मोड आलेली मुगाची उसळ , बॉईल चणा, मटकीची उसळ, घरगुती पनीर, पनीर पराठा यांचा समावेश करावा. रोजच्या जेवणात साल असलेली मुगाची डाळ खावी. आजारपणानंतर डीहायड्रेशनचे प्रमाणही वाढते. घशाला, तोंडाला कोरड पडते, यासाठी आखी फळ किंवा त्यांचा ज्यूस तर घ्यावाच पण दिवसातून किमान एक ग्लास नारळपाणी प्यायलाच हवे. सध्या बाजारात येत असलेले टरबूज, खरबूज याबरोबरच मोसंबी, संत्रा यांचा ज्यूस घेणेही शरिरासाठी आवश्यक असते. असा संतुलित आहार घेतल्यास रुग्णाला पुन्हा पहिल्यासारखी ऊर्जा तर मिळतेच त्याचबरोबर ताजेतवानेही वाटते आणि पुन्हा काम करण्याचा उत्साह येतो, असा सल्ला आहारतज्ज्ञ मीनल शिंपी यांनी दिला आहे.