सिडको : ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आले. दरम्यान महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे १९ हजार ४३६ गणेश मूर्ती संकलन करण्यात आले, तर सुमारे १६ टन १३५ किलो निर्माल्य गोळा करण्यात आले असून परिसरात प्रथमच फिरत्या कृत्रिम तलावात नागरिकांनी प्रतिसाद देत २०४ गणेश मूर्तींचे संकलन केल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
कोरोना महामारीमुळे तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने यंदाच्या वर्षी नदीपात्रात व इतरत्र गणेश मूर्ती विसर्जन करू नये यासाठी देव द्या, देव पण घ्या, पर्यावरण रक्षणासाठी मूर्तीदान करा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास सर्व गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये महापालिकेच्या सिडको विभागाअंतर्गत गोविंद नगर येथील जिजाऊ महिला सभागृह, जुने सिडको येथील छत्रपती व्यायाम शाळा, पवन नगर, कामटवाडे येथील मीनाताई ठाकरे शाळा, इंदिरानगर येथील डे केअर स्कूल, पिंपळगाव खांब येथील वालदेवी नदीजवळ तसेच अश्विन नगर येथील राजे संभाजी स्टेडियम आदी ठिकाणी महापालिकेच्या वतीने मूर्ती संकलन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. नागरिक स्वतःच्या वाहनाने परिवारासह येऊन पूजाअर्चा करीत भक्तीभावाने कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करून मूर्ती दान करण्यात येत होते. तसेच यंदाच्या वर्षी अनेक नागरिकांनी घरीच बाप्पाचे विसर्जन केल्याचे चित्रही परिसरात बघावयास मिळाले. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, बांधकाम विभागाचे प्रमुख ए.जे. काझी, आरोग्य विभागाचे प्रमुख संजय गांगुर्डे, पाणीपुरवठा विभागाचे गोकूळ पगारे, विद्युत विभागाचे प्रकाश मोरे व मोहन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संकलन करण्यात आल्या. मूर्ती संकलनासाठी १५ डंपर तर निर्माल्यसाठी गोळा करण्यासाठी ९ ट्रॅक्टर तर विविध सोसायट्यांमधील मूर्ती संकलनासाठी फिरत्या कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी सुमारे शंभराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान सकाळी मूर्ती संकलनाच्या ठिकाणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सिडको प्रभाग सभापती सुवर्णा मटाले, महिला नगरसेवक किरण दराडे, रत्नमाला राणे, मुकेश शहाणे, प्रवीण तिदमे, छाया देवांग, राजेंद्र महाले, अलका आहिरे, प्रतिभा पवार आदि नगरसेवकांनी मूर्ती संकलनास सुरुवात करीत नागरिकांनी मूर्ती दान करण्याचे आवाहन केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर च्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.