नाशिककर बाहेर, बाहेरचे नाशकात
By Admin | Updated: August 28, 2015 22:56 IST2015-08-28T22:52:37+5:302015-08-28T22:56:09+5:30
नाशिककर बाहेर, बाहेरचे नाशकात

नाशिककर बाहेर, बाहेरचे नाशकात
नाशिक : पहिल्या शाही पर्वणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने ठिकठिकाणी केलेल्या नाकेबंदीची चर्चा अगोदरच घरोघरी पोहोचल्याने आणि अनेकांनी रविवारपर्यंत सुट्या जाहीर केल्याने या गर्दीपासून सुटका करण्यासाठी अनेक नाशिककरांनी शहराबाहेर पडणे पसंत केले असून सुटीची पर्वणी साधली आहे. त्यामुळे नाशिककर बाहेर आणि बाहेरचे पाहुणे नाशकात अशी काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. पहिली पर्वणी शनिवारी (दि.२९) होत असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरभर बॅरिकेडिंगद्वारे नाकेबंदी केली आहे. पोलीस प्रशासनाला उशिराने का होईना शुक्रवारी सायंकाळपर्यंत निर्बंध शिथिल करण्याचे शहाणपण सुचल्याने दिवसभर नाशिककरांनी भीतभीतच आपली वाहने बाहेर काढली, परंतु पोलिसांच्या या नाकेबंदीची चर्चा घरोघरी जाऊन पोहोचल्याने असंख्य नाशिककरांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता.