अवयवदान जनजागृतीसाठी पायी प्रचार वारी
By Admin | Updated: January 3, 2017 01:36 IST2017-01-03T01:36:26+5:302017-01-03T01:36:45+5:30
देशपांडे दाम्पत्याचा उपक्रम : नाशिक ते आनंदवन ११०० किलोमीटरची पदयात्रा

अवयवदान जनजागृतीसाठी पायी प्रचार वारी
सातपूर : नागरिकांमध्ये अवयवदानाचे महत्त्व वाढीस लागावे म्हणून अंबड रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक सुनील देशपांडे हे सपत्नीक नाशिक ते आनंदवन या ११०० किलोमीटर अंतराच्या पायी अवयवदानवारीला निघालेले आहेत. वारी दरम्यानच्या गावांमध्ये देशपांडे दाम्पत्य अवयवदानाविषयी प्रचार, प्रसार करीत आहेत. अवयवदान करण्याची लोकांची इच्छा आहे, परंतु त्यांना फारशी माहिती नाही. अवयवदानाविषयी लोकांच्या मनात भ्रामक कल्पना आहेत. या भ्रामक कल्पना दूर करून लोकांनी अवयवदान करावेत. याबाबत जनजागृती झाल्यास या चळवळीला बळ प्राप्त होणार आहे. ही चळवळ वाढीस लागल्यास तामिळनाडूपेक्षा अवयवदानात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. मनुष्य साधारणपणे ११ प्रकारचे अवयवदान करू शकतो. प्रत्येकाच्या मनात अवयवदानाचे महत्त्व वाढावे म्हणून सुनील देशपांडे, रंजना देशपांडे, प्रियदर्शन बापट हे १४ नोव्हेंबरपासून अवयवदान वारीला निघालेले आहेत. नाशिक ते आनंदवन या पायी अवयवदान वारीमुळे लोकांच्या मनात अवयवदानाची जागरूकता निर्माण होईल, असा आशावाद देशपांडे यांनी ठिकठिकाणी व्यक्त केला आहे. तर देशपांडे यांच्या या उपक्रमाचे देखील ठिकठिकाणी स्वागत होत आहे. या अवयवदान वारीला तुलसी आय हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहे. (वार्ताहर)