महामार्ग प्राधिकरणाला वृक्षलागवडीचे आदेश
By Admin | Updated: May 15, 2014 22:02 IST2014-05-15T00:45:07+5:302014-05-15T22:02:47+5:30
नाशिक : वडपे ते गोंदे म्हणजे ठाणे, नाशिक ते धुळ्यापर्यंत राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण.

महामार्ग प्राधिकरणाला वृक्षलागवडीचे आदेश
नाशिक : वडपे ते गोंदे म्हणजे ठाणे, नाशिक ते धुळ्यापर्यंत राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना हजारो झाडांची कत्तल करणार्या राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला एका वृक्षतोडीच्या बदल्यात तीन झाडे याप्रमाणे लागवड करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. निवृत्त वनअधिकार्यांच्या देखरेखीखाली ही वृक्षलागवड करायची असून, या अधिकार्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. वडपे ते गोंदेदरम्यान राष्टÑीय महामार्गाच्या वतीने रुंदीकरण करताना हजारो झाडे तुटणार असल्याने नाशिक कृती समितीच्या वतीने अश्विनी भट, आनंद देशपांडे आणि ऋषिकेश नाझरे यांनी उच्च न्यायालयात २००६ मध्ये याचिका दाखल केली आहे. सध्या खटल्याचा पाठपुरावा ‘हिरवा वणवा’चे संचालक राजन दातार करीत आहेत. या याचिकेसंदर्भात न्यायालयाने नुकतेच महत्त्वाचे आदेश दिले असून, महामार्ग विभागाला वृक्षलागवडीसाठी आदेश देताना साडेचार कोटी रुपयांची बॅँक गॅरंटी देण्याचे आदेश दिले आहेत. वृक्षलागवडीचे काम शास्त्रोक्त पद्धतीने व्हावे, यासाठी वनखात्याचे अधिकारी नियुक्त करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यानुसार निवृत्त सहायक वनसंरक्षक बी. पी. पवार आणि एस. डी. नारनवार यांची नियुक्ती न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि ए. एस. ओका यांच्या खंडपीठाने केली आहे. धुळे जिल्ह्यासाठी पी. एस. पाटील तर ठाणे जिल्ह्यासाठी वनखात्याने नाव सुचविल्यावर त्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, महामार्ग महापालिकेच्या हद्दीतून जात असल्याने त्यासंदर्भातही न्यायालयाने महापालिकेसदेखील वृक्षलागवड होते किंवा नाही हे बघतानाच शहरात न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय वृक्षतोड करण्यास मनाई केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत वृक्षांची छाटणी आणि तोडीबाबत न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात पुढील सुनावणी आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. (प्रतिनिधी)