नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत डांबरी रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी १९ कोटी आणि खडीचे कच्चे रस्ते दुरुस्तीसाठी १८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना शिवसेनेसह अपक्ष सदस्यांनी आक्षेप घेत त्यासाठी मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली. परंतु, सभापतींनी त्यास मंजुरी दिल्याने सेनेच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्थायी समितीची सभा सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, प्रशासनाकडून १९ कोटी १२ लाख रुपये खर्चाचे डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीचे विभागनिहाय प्रस्ताव ठेवण्यात आले होते. याशिवाय, विभागनिहाय खडीचे कच्चे रस्ते दुरुस्तीसाठी खडी, मुरूमसह जेसीबी, डंपर आदी साहित्य पुरविण्यासाठी १८ कोटी २० लाख रुपयांचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. यावेळी, शिवसेनेचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर रस्ते दुरुस्तीसाठी मायक्रो सर्फेसिंग तंत्राचा वापर करण्याची सूचना केली. त्यामुळे मनपाची आर्थिक बचत होणार असल्याचे सांगितले.यावेळी, शहर अभियंता उत्तम पवार यांनी नवी मुंबईकडून त्याबाबतची माहिती मागविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले तर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी येत्या अंदाजपत्रकात शहरातील दोन रस्ते प्रायोगिक तत्त्वावर या तंत्राने करण्यासाठी तरतूद करण्याचे आदेश दिले. सूर्यकांत लवटे यांनी सदर डांबरी रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे ही पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात घेणे अपेक्षित असताना त्याला लागलेल्या विलंबाबद्दल जाब विचारला आणि आताच प्रभागनिहाय रस्ते विकासाची कामे केली जात असताना ही नवीन कोणती कामे सुरू करण्यात येणार आहेत, असा सवाल उपस्थित केला. मुशीर सय्यद यांनी सदरच्या प्रस्तावांची माहिती सविस्तर सादर करेपर्यंत विषय तहकुबीची सूचना मांडली तर जगदीश पाटील यांनी रस्ता दुरुस्तीचे समर्थन करत त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. यावेळी सभापतींनी प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगताच सेना सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली परंतु, नंतर त्यांचा विरोध मावळला. यावेळी, सूर्यकांत लवटे यांनी नाशिकरोडमधील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली असता अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी पुढील आठवड्यात पोलीस बंदोबस्तात मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. डी. जी. सूर्यवंशी यांनी प्रशासनावर सत्ताधाºयांचा वचक राहिला नसल्याचे सांगत भाजपाला चिमटे काढले, तर पेस्ट कंट्रोल ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासंबंधीचा प्रस्ताव पुढील सभेत ठेवण्याचे आदेश सभापतींनी दिले.
शिवसेनेच्या सदस्यांकडून रस्ते दुरुस्ती प्रस्तावांवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:19 IST