शिवसेनेच्या थंडपणावर पक्षश्रेष्ठींची नाराजी
By Admin | Updated: June 11, 2017 01:02 IST2017-06-11T01:02:37+5:302017-06-11T01:02:52+5:30
जिल्ह्यातील सेना नेतृत्व अपयशी ठरल्याचा अप्रत्यक्ष ठपका खासदार संजय राऊत यांनी ठेवल्याने सेनेंतर्गत नेतृत्व बदलाच्या चर्चेने जोर धरला आहे.

शिवसेनेच्या थंडपणावर पक्षश्रेष्ठींची नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यव्यापी शेतकरी संपाचा केंद्रबिंदू नाशिक जिल्हा असतानाही या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा राजकीय फायदा करून घेण्यात जिल्ह्यातील सेना नेतृत्व अपयशी ठरल्याचा अप्रत्यक्ष ठपका खासदार संजय राऊत यांनी ठेवल्याने सेनेंतर्गत नेतृत्व बदलाच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळेच येत्या महिन्यात पक्ष संघटनेला त्यांच्यातील आक्रमकपणा दाखवून देण्याचे आवाहन राऊत यांना करावे लागले आहे.
१ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर या संपाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी, यापूर्वी सत्तेवर असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीने कुंपणावर उभे राहूनच शेतकरी आंदोलनाला मदत केली तर सत्तेत सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उघडपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून पुरेपूर राजकीय फायदा पदरात पाडून घेतला. एवढेच नव्हे तर या संपाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आपसूकच चालून आले. त्यामानाने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी या संपूर्ण आंदोलनादरम्यान आस्तेकदम
टाकले, विशेष म्हणजे राज्यव्यापी बंदमध्येदेखील शिवसेनेचा जेमतेम सहभाग राहिल्यामुळे या बंदलाही पाठिंबा मिळू शकला नाही. पदाधिकाऱ्यांची निष्क्रियतापूर्वी सेनेचा बंद म्हटला की, व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्याची गरज नव्हती; परंतु परवा मात्र सेनेच्या नेत्यांना रस्त्यावर उतरून काही ठरावीक भागापुरती दुकाने बंद करावी लागली. त्यामुळे हाती आलेली चांगली संधी घालविल्याची सल सेनेच्या पक्षश्रेष्ठींनी बोलून दाखविली आहे. शेतकरी कर्जमुक्तीबाबत नाशिकमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला त्याच नाशिकमध्ये शेतकरी संपाबाबत राज्यव्यापी परिषद घेतली जाते व सेनेच्या नेतृत्वाला साधी विचारणाही केली गेली नसल्याची बाब पक्षाला चांगलीच खटकली. या साऱ्या गोष्टीस सेनेचे जिल्हा व महानगरप्रमुखच जबाबदार असल्याचा निष्कर्ष पक्षाने काढला असावा त्यामुळेच अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलण्याचा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिल्याची चर्चा आता पक्षात होऊ लागली आहे.