आश्रमशाळेत नोकर भरतीचे पितळ उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:34+5:302021-09-18T04:16:34+5:30
घोटी/इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील एका तथाकथित शिक्षण संस्थेने शासनांतर्गत मान्यताप्राप्त असल्याचा हवाला देत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नोकर भरतीचा ...

आश्रमशाळेत नोकर भरतीचे पितळ उघडे
घोटी/इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील एका तथाकथित शिक्षण संस्थेने शासनांतर्गत मान्यताप्राप्त असल्याचा हवाला देत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नोकर भरतीचा घाट घातला होता. मात्र, ही संस्था शासनांतर्गत मान्यताप्राप्त असल्याची शंका घेत सत्यता पडताळून पाहत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा घोटी कृऊबाचे उपसभापती गोरख बोडके यांनी या संस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. अखेर संबंधित संस्थेने शुक्रवारी (दि. १७) आयोजित केलेल्या मुलाखती अकस्मात कोरोनाचे तांत्रिक कारण देत रद्द केल्या आहेत. मात्र, इगतपुरी किंवा आवळखेड येथे ही शाळाच अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांची फसवणूक टळल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाचा हवाला देत चक्क शाहू, फुले, आंबेडकर आदी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करत व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासन मान्यताप्राप्त निवासी व अनिवासी आश्रमशाळा असल्याचा दावा करत या तथाकथित शैक्षणिक संस्थेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा घाट घातला होता. या भरतीसाठी जिल्ह्यातील आघाडीच्या दैनिकातून मुलाखतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने बेरोजगार सुशिक्षित युवती व युवकांनी नोकरीच्या आशेने प्रयत्न सुरू केले होते. शुक्रवारी २७ जागांच्या मुलाखतीसाठी नांदेड, बीड, परभणी, नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आदी महाराष्ट्रभरातून १,५०० च्या जवळपास युवक व युवती इगतपुरीत आले होते.
दरम्यान, सामाजिक न्याय विभागाची आश्रमशाळा अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने या संस्थेच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे कक्ष अधिकारी मोरे यांच्याशी संपर्क साधत माहिती घेतली असता, शासनस्तरावर अशा पद्धतीची आश्रमशाळा वा शाळा मान्यताप्राप्त नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. अशा कोणत्याही शिक्षक भरती प्रक्रियेला परवानगी दिली नसल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या कक्षातून दिल्याची माहिती गोरख बोडके यांनी दिली. यानंतर बोडके यांनी या संस्थेच्या चालकाला जाब विचारला असता, संबंधिताचे पितळ उघडे पडले.
इन्फो
कारवाईची मागणी
दरम्यान, बोडके यांच्या सतर्कतेमुळे बेरोजगार व सुशिक्षित युवती व युवकांची होणारी संभाव्य फसवणूक टळली आहे. मात्र, महापुरुषांची नावे बिनदिक्कतपणे वापरत फसवणुकीचे उद्योग करणाऱ्या संबंधित महाभागावर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे ज्ञानेश्वर लहाने, शहराध्यक्ष वसीम सय्यद, शहर उपाध्यक्ष प्रवीण कदम, मदन कडू, नारायण वळकंदे, ज्ञानेश्वर पासलकर, राजू गांगड, पोपटराव भागडे आदींनी केली आहे
कोट...
शिपाई पदाकरिता आलेल्या देविदास रामा भोईर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आश्रमशाळा संस्थाचालक गोपाळ मधुकर पवार यांच्याबद्दल फसवणूक झाल्याची तक्रार असून, त्याबद्दलच्या पडताळणीकरिता आयुक्त व समाजकल्याण विभागाकडे चौकशी केली जात आहे. कागदपत्रांची पूर्तता करून संस्था चालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- वसंत पथवे, पोलीस निरीक्षक, इगतपुरी
फोटो- १७ इगतपुरी आश्रमस्कूल
बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित आश्रमशाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना गोरख बोडके व फसवणूक झालेले तरूण व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
170921\img_20210917_141828-1.jpg~170921\17nsk_38_17092021_13.jpg
खोटी शिक्षक भरतीसाठी फसवणुक करणाऱ्या संस्था चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांना देतांना गोरख बोडके व पदाधिकारी.~फोटो- १७ इगतपुरी आश्रमस्कूल