ढीगभर फाइलींचा उपसा अवघे नऊ अभियंते करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:27 IST2018-06-02T00:27:57+5:302018-06-02T00:27:57+5:30
शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सुमारे अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले असून, त्यांची पडताळणी करण्यासाठी अवघे नऊ अभियंता शिल्लक असून ते प्रत्यक्ष घटनास्थळी केव्हा मोजमाप करणार? असा प्रश्न केला जात आहे.
ढीगभर फाइलींचा उपसा अवघे नऊ अभियंते करणार?
नाशिक : शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सुमारे अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले असून, त्यांची पडताळणी करण्यासाठी अवघे नऊ अभियंता शिल्लक असून ते प्रत्यक्ष घटनास्थळी केव्हा मोजमाप करणार? असा प्रश्न केला जात आहे. राज्य शासनाच्या वतीने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आल्यानंतर महापालिकेने अशाप्रकारचे बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी दि. ३१ पर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार सुमारे अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले आहेत. परंतु हे किती प्रस्ताव आहेत, याची पडताळणी करण्यासाठीदेखील महापालिकेला उसंत मिळालेली नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे नगररचना विभागातील अभियंत्यांच्या बदल्या झाल्या असून, पुरेशा प्रमाणात अभियंते या विभागात उपलब्ध नसल्याचे अडचण निर्माण झाली आहे. नगररचना विभागात एकूण २२ अभियंत्यांपैकी १३ अभियंत्यांच्या बदल्या झाल्या असून, सध्या केवळ नऊ अभियंते शिल्लक आहेत. त्यांच्याकडून नियमित कामे सांभाळून बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याच्या योजनेत दाखल प्रकरणांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा कशी आणि केव्हा करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरचनाला उपसंचालक
नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागात सध्या सहायक संचालक नगररचना असे पद आहे. तथापि, मध्यंतरी शासनाने नगररचना उपसंचालकपद मंजूर केले आहे. नाशिक महापालिकेचा वाढता विस्तार आणि नव्या विकास आराखड्याची अंमलबजावणी याचा विचार करता उपसंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली असून, त्यासंदर्भात शासनाला पत्रदेखील दिले आहे.