मुदतवाढीत पडली अवघ्या सव्वादोनशे ठरावांची ‘भर’
By Admin | Updated: March 4, 2015 01:06 IST2015-03-04T01:04:26+5:302015-03-04T01:06:32+5:30
मुदतवाढीत पडली अवघ्या सव्वादोनशे ठरावांची ‘भर’

मुदतवाढीत पडली अवघ्या सव्वादोनशे ठरावांची ‘भर’
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोसायटी गटातून व अन्य सर्व गटांसाठी ठराव करून मतदार प्रतिनिधींची नावे करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीत अवघ्या २३९ मतदार प्रतिनिधींचे ठराव प्राप्त झाल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. यापूर्वी ठराव दाखल करण्याची मुदत २० फेब्रुवारी अखेरपर्यंत ठराव करण्याच्या मुदतीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे व विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे एकूण ३६९५ मतदारांचे ठराव प्राप्त झाले होते. दरम्यानच्या काळात मतदार सभासदांचे ठराव देण्यास दिलेल्या २ मार्चपर्यंत देण्यात आलेल्या मुदतवाढीत आणखी २३९ सभासद मतदारांच्या ठरावांची भर पडली आहे. त्यामुळे आता सभासद मतदार ठरावांची एकूण संख्या ३९३४ इतकी झाली आहे. अ गटासाठी (सोसायटी गट) एकूण पात्र सभासद मतदार १०२४ व ब २४२९ तसेच पुरवणीचे २३ व वैयक्तिक / ट्रस्टचे ४५८ असे एकूण ३९३४ इतकी सभासद मतदार संख्या निश्चित झाली आहे. प्रारूप यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर १२ मार्चपर्यंत या प्रारूप मतदार यादीवर हरकती, आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या आलेल्या हरकती व आक्षेपांवर निर्णय देण्याची अंतिम तारीख २३ मार्च असून, २५ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसारच मग जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर करण्यात येईल, असे समजते. विशेष म्हणजे मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारसंख्या नऊ ते दहा हजारांच्या घरात असतानाच आता ती चक्क चार हजारांच्या आतच सीमित राहिल्याने उमेदवारांची धावपळ वाढणार आहे. (प्रतिनिधी)