प्रमुख पाहुण्यांनाच पळवून लावले
By Admin | Updated: August 12, 2016 01:17 IST2016-08-12T01:17:31+5:302016-08-12T01:17:59+5:30
प्रमुख पाहुण्यांनाच पळवून लावले

प्रमुख पाहुण्यांनाच पळवून लावले
नाशिक : कुंभमेळ्याच्या निमित्ताने सोशीक नाशिककरांचा अंत बघणाऱ्या पोलीस यंत्रणेने पर्व समाप्तीच्या दिवशीही असाच अतिरेक केल्याने ध्वजावतरण सोहळ्याचे मुख्य अतिथी नाणीजचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज सोहळ्याच्या अवघ्या पाचशे मीटर अंतरावरून माघारी फिरले आणि थेट मुंबईला रवाना झाले.
कुंभमेळ्याच्या समारोप पर्वासाठी सुरुवातील प्रमुख अतिथी म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्य आणि वल्लभपीठाधिश परेशजी महाराज यांचेच नाव निश्चित होते. त्यानुसार त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. कुंभमेळा समाप्तीच्या सोहळ्यासाठी नरेंद्राचार्य हे नियोजित वेळेनुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचत होते. परंतु मालेगाव स्टॅँडजवळ त्यांची मोटार आल्यानंतर पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवत मोटार नेता येणार नाही त्याऐवजी पायी जा, असे सांगितले. पोलिसांना त्यांच्या अनुयायांनी या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असल्याचे सांगून बघितले, मात्र नाशिकच्या पोलिसांच्या खाकीची शिस्त मोडेना, अखेरीस नाराज झालेले नरेंद्राचार्य तेथूनच माघारी फिरले आणि मुंबईला रवाना झाले. विशेष म्हणजे पुरोहित संघाने ज्यांच्याकडे त्यांना सन्मानाने आणण्याची जबाबदारी दिली होती, ते महोदय कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठावर होते. नरेंद्राचार्य निघून गेल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी मोबाइलवर हा प्रकार सांगितला. गेल्या वर्षी म्हणजे २००३-२००४ मध्ये नरेंद्राचार्य प्रमुख अतिथी असल्याने त्यांच्या अनुयायांच्या गर्दीमुळेच सोहळा चांगल्या रीतीने पार पडला होता. यंदाही ध्वजारोहण सोहळ्यास नरेंद्राचार्यांचे अनुयायी लक्षवेधी ठरले होते. पोलिसांच्या अतिरेकामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. पोलिसांनी सुरक्षेचा बाऊ करीत पांडे मिठाईजवळ उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाची दिशाच बदलली़ (प्रतिनिधी)