पुरुष उमेदवारांसाठी एकमेव आखाडा
By Admin | Updated: January 20, 2017 00:22 IST2017-01-20T00:22:21+5:302017-01-20T00:22:38+5:30
प्रचंड चुरस : उमेदवारीसाठी पहिली लढत स्वपक्षातील इच्छुकांसोबतच

पुरुष उमेदवारांसाठी एकमेव आखाडा
शैलेश कर्पे/सचिन सांगळे सिन्नर
तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच गट महिलांसाठी राखीव आहेत. एकमेव नांदूरशिंगोटे गट इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने या गटातून पुुरुषांना मिनी मंत्रालयात पाऊल ठेवता येणार आहे. त्यामुळे या गटात उमेदवारी मिळविण्यासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
भाजपा व शिवसेना यांच्या खरी चुरस रंगण्याची शक्यता असून, उमेदवारी न मिळालेले उमेदवार बंडखोरी करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात
आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांना पहिली लढत स्वपक्षातील इच्छुकांसोबतच द्यावी लागणार आहे.
पूर्वीचा जुना वावी व गेल्या दहा वर्षांपासून नांदूरशिंगोटे नावाने ओळखला जाणारा सदर गट अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या गटात मराठा आणि वंजारी या दोन समाजाचे प्राबल्य आहे. आरक्षणाचा अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून या गटातून वंजारी समाजाचा उमेदवार विजयी होण्याची परंपरा आहे. आजपर्यंत या गटात विद्यमान आमदारांचे वर्चस्व राहिल्याचा इतिहास आहे. माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचे या गटात पंधरा वर्षे वर्चस्व राहिले. त्यानंतर २००७ साली माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे बाळासाहेब वाघ हे जिल्हा परिषद सदस्य झाले.
गेल्या निवडणुकीत नांदूरशिंगोटे गट अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होता. २०१२ च्या निवडणुकीत कोकाटे समर्थक शीला गवारे या गटातून विजयी झाल्या. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून या गटावर माजी आमदार कोकाटे यांचे वर्चस्व आहे.
नांदूरशिंगोटे गटातील पांगरी गण माजी आमदार कोकाटे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पांगरी गणातून भरभक्कम आघाडी घेणारा उमेदवार जिल्हा परिषदेत जात असल्याचा गेल्या दहा वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीतही नांदूरशिंगोटे गटात पांगरी गणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सन १९९२ पासून नांदूरशिंगोटे गटातून सुरेश गर्जे, स्व. कमल सानप, शुभांगी गर्जे, बाळासाहेब वाघ व शीला गवारे विजयी झाले आहेत. मात्र या गटात अद्याप एकाही सदस्याला जिल्हा परिषदेत सभापतिपद मिळाले नाही. या निवडणुकीत तालुक्यातील सहापैकी पाच गट महिलांसाठी राखीव आहेत. एकमेव नांदूरशिंगोटे गटातून पुुरुष उमेदवार जिल्हा परिषदेत जाणार आहे.
तालुक्यातील प्रश्न व समस्या मांडण्याची व विविध विकासकामांसाठी निधी आणण्याची जबाबदारी या गटातून विजयी होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवारी देताना तगड्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवेल असेच चित्र आहे. मिनी मंत्रालयात भांडून तालुक्यातील प्रश्नांची तड लावणारा व विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणणारा उमेदवार प्रत्येक पक्षाकडून अभिप्रेत आहे.
उमेदवारी मिळविण्यासाठी सध्या शिवसेना व भाजपात प्रचंड चुरस असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेत पाऊल ठेवण्यासाठी पक्षाची उमेदवारी मिळविण्याची पहिली लढत स्वकीयांसोबतच असल्याचे शिवसेना व भाजपात दिसून येत आहे. इच्छुकांनी गटातील सर्वच गावे पिंजून काढली आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल याची पक्की खात्री अद्याप कोणालाही नसल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे.