पैसे दिल्यानंतरच घडते नातेवाइकांना प्रसूत महिलेच्या बाळाचे दर्शन
By Admin | Updated: November 25, 2014 00:08 IST2014-11-25T00:08:13+5:302014-11-25T00:08:30+5:30
पैसे दिल्यानंतरच घडते नातेवाइकांना प्रसूत महिलेच्या बाळाचे दर्शन

पैसे दिल्यानंतरच घडते नातेवाइकांना प्रसूत महिलेच्या बाळाचे दर्शन
जुने नाशिक : ‘‘पैसे द्या, तरच सांगू मुलगा झाला की मुलगी, प्रायव्हेट दवाखान्यात द्यावेच लागतात ना पैसे...’’ अशा पद्धतीने जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रसूती विभागातील काही महिला कर्मचारी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या नातेवाइकांकडून ‘वसुली’ करत असल्याचा गंभीर प्रकार आज (दि. २४) उघडकीस आला. रुग्णालयातील अधिकृत सूत्रांनीदेखील संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या अशा विकृत मानसिक प्रवृत्तीचा निषेध नोंदवून या प्रकाराला दुजोरा दिला आहे.
पालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा बाह्यरुग्ण तपासणी व प्रसूतीचा आकडा सर्वाधिक असून, या रुग्णालयात वडाळागाव, जुने नाशिक, पंचवटी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या रुग्णालयातील प्रसूती विभागातील काही ठरावीक महिला कर्मचारी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाइकांकडून प्रसूती झाल्यानंतर पैसे उकळत असल्याचा आरोप काही रुग्णांनी यापूर्वीही केला होता; मात्र सोमवारी वडाळागावातील झीनतनगर येथे राहणाऱ्या ताहेरा जहांगीर शेख (प्रसूत महिलेची सासू) यांच्याकडे त्यांच्या सुनेची प्रसूती झाल्यानंतर दोन महिला कर्मचाऱ्यांनी सहाशे रुपयांची मागणी केल्याने सदर प्रकार उजेडात आला.