६२ लाख नाशिककरांसाठी अवघे सहा हजार पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:35+5:302021-02-05T05:38:35+5:30
-- नाशिक : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला, तरीही शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मनुष्यबळ ...

६२ लाख नाशिककरांसाठी अवघे सहा हजार पोलीस
--
नाशिक : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला, तरीही शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मनुष्यबळ मात्र वाढताना दिसत नाही. नुकतीच राज्याच्या गृहमंत्र्यांनी पाेलीस भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्याची घोेषणा केली असली, तरी नाशिकच्या वाट्याला नव्याने पोलीस कधी व किती लाभणार? हे आज तरी निश्चितपणे सांगणे कठीण आहे. जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेता, सरासरी एक हजार लोकांमागे केवळ एक पोलीस अशी अवस्था आहे.
एकीकडे नाशिक शहर झपाट्याने विकसित होत आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांचा परिसरही तितकाच वेगाने विस्तारत आहे. मुंबई, पुण्याच्या तुलनेचे व राज्यातील अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या नाशकात मात्र पोलिसांची संख्या कमी आहे. आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयांचे मनुष्यबळाची मंजूर पदे वाढविण्याची गरज आहे, तसेच मंजूर पदांइतकेच मनुष्यबळ पुरविणेही अत्यावश्यक आहे. शहराससह ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था राखताना पोलीस दलाची दमछाक होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे ‘खाकी’वर मोठा ताण निर्माण होताना दिसून येतो, तसेच नागरिकांनाही अत्यावश्यक वेळी पोलीस मदत मिळविताना विलंब सहन करावा लागतो.
वर्षभरापूर्वीच ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील काही पोलीस ठाणे शहराच्या आयुक्तालय हद्दीत समाविष्ट करण्याच्या हालचालींना वेग आला होता. कारण ग्रामीण पोलिसांचे अपुरे मनुष्यबळामुळे शहराजवळची खेडी आयुक्तालयाला जोडण्याचे विचाराधीन आहे. त्या दृष्टीने तसा प्रस्तावही तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाकडे ३ हजार १६ कर्मचारी तर अधीक्षक कार्यालयाकडे (पंधरा तालुक्यांची हद्द) ३ हजार २०० कर्मचारी आहेत. अधीक्षक कार्यालयाच्या मंजूर पदांच्या तुलनेत २१३ पदे रिक्त आहेत. मुळात मंजूर पदांची संख्याही कमीच आहे. नाशिक ग्रामीणचा विस्तार प्रचंड मोठा असून, आदिवासीबहुल तालुक्यांचीही संख्या अधिक आहे. यामुळे पोलीस बळ वाढविणे गरजेचे आहे.
---पॉइंटर्स---
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या : ६२,०००,००
जिल्ह्यातील पोलीस संख्या : ६,२००
----इन्फो---
अतिरिक्त कामाचा वाढता ताण
शहर असो की, ग्रामीण दोन्हीकडे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याचा परिणाम पोलीस दलाच्या कामावरही होताना दिसून येतो. शहरातील सुमारे १५ ते १६ लाख लोकसंख्येकरिता ३ हजार पोलीस कार्यरत असून, उर्वरित ग्रामीण भागातील ४० ते ४५ लाख लोकांसाठी केवळ ३ हजार २०० पोलीस कर्मचारी अधीक्षक कार्यालयाकडे आहेत. यावरून पोलीस दलावरील दैनंदिक कामाचा ताण सहज लक्षात येतो.
---इन्फो---
गुन्हेगारीचा आलेख चढताच...
शहरासह ग्रामीण भागातील गुन्हेगारी लक्षात घेता जबरी चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खून, जबरी लुटीच्या घटना या अद्यापही कमी झालेल्या नाहीत. दिवसेंदिवस या गुन्ह्यांमध्ये वाढच होत चालली आहे. नाशिक जिल्ह्याला गुजरात, मध्य प्रदेशसारख्या राज्यांची सीमा अगदी जवळ असून, आंतरराज्यीय टोळ्याही नाशकात सक्रीय होताना दिसून येतात. सशस्त्र दरोडेही नाशकात यापूर्वी पडले आहेत. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आणि गाव पातळीवरील पोलीस ठाणे, पोलीसचौक्या सक्षम करण्याकरिता पुरेशे मनुष्यबळ पुरविणे तितकेच गरजेचे आहे.
-----
फोटो आर वर३१पोलीस/१/२ नावाने सेव्ह आहे.
३१डमी फॉरमेट नावाने