तंत्रशिक्षण प्रवेशासाठी केवळ ३९२ अर्ज निश्चित
By Admin | Updated: June 10, 2017 01:32 IST2017-06-10T01:30:51+5:302017-06-10T01:32:52+5:30
नाशिक : विभागातून अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत (दि.९) अवघे ३४० अर्ज निश्चित झाले

तंत्रशिक्षण प्रवेशासाठी केवळ ३९२ अर्ज निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विभागातून अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत (दि.९) अवघे ३४० अर्ज निश्चित झाले असून, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी केवळ ५२ अर्ज निश्चित झाले आहेत. बारावीच्या गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढून १७ जूनपर्यंत नाशिकसह विभागातून हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासप्रमासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची शक्यता असून, अशा विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंगचे ४६ व फार्मसीचे ३८ सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या सूचनेनुसार पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येत असून, या प्रक्रियेतून संस्थास्तरावरील प्रवेशासाठी उपलब्ध जागांवर प्रवेशासाठी संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांनी सोमवारपासूनच (दि.५) सुरुवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रांवर (फॅसिलिटेशन सेंटर) अर्ज निश्चत व प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित करण्यासाठी व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारे अर्ज निश्चित करण्यासाठी व प्रमाणपत्रांची पडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्याचेच नाव सक्षम प्राधिकारी यांनी तयार केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यंदा अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र वैद्यकीय व दंतवैद्यकीय राज्य सामायिक परीक्षा कक्षातर्फे सीईटी घेण्यात आली होती.
सीईटी परीक्षेच्या निकालासोबतच इंजिनिअरिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार १७ जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत असून, १७ जूनपर्यंत प्रवेश अर्ज निश्चित करून अर्ज व कागदपत्र पडताळणी करता येणार आहे. १९ जूनला प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट जाहीर होणार असून, २२ जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.