जिल्ह्यात फक्त १८० कोटी शिल्लक
By Admin | Updated: January 3, 2017 00:56 IST2017-01-03T00:56:07+5:302017-01-03T00:56:27+5:30
एटीएम बंदच : नोटाबंदीच्या झळा कायम; अन्य बॅँकांमध्ये ५००च्या नोटांचा तुटवडा

जिल्ह्यात फक्त १८० कोटी शिल्लक
नाशिक : स्टेट बॅँक वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बॅँकांना पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे एटीएम पैशांअभावी बंद पडले असून, सामान्यांना नोटाबंदीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दुसरीकडे स्टेट बॅँकेकडे फक्त १३६ कोटी रुपये व अन्य बॅँकांकडे ५० कोटी रुपये नवीन वर्षात शिल्लक आहेत. रिझर्व्ह बॅँकेकडून नव्याने पैसे कधी मिळतील याचा नेम नसल्याने १८० कोटींवरच जिल्ह्याचा आर्थिक गाडा हाकावा लागणार आहे. केंद्र सरकारने एटीएममधून साडेचार हजार रुपये काढण्याची मुभा दिली असली तरी, स्टेट बॅँक वगळता अन्य बॅँकांकडे पुरेसे पैसेच शिल्लक नसल्याने त्यांच्याकडून सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा अनुभव नाशिककर नागरिक घेत आहेत. जिल्ह्यात फक्त स्टेट बॅँकेचेच एटीएम खऱ्या अर्थाने सेवा देत असून, अन्य राष्ट्रीयीकृत बॅँकांचे पन्नास टक्के एटीएम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी, त्यातील ३० टक्के एटीएम दिवसातून एक तासच कार्यरत असल्याचे वास्तव आहे. यामागे पैशांची कमतरता असे कारण आहे. स्टेट बॅँकेकडे १३६ कोटी शिल्लक आहेत तर अन्य बॅँकांकडे ५० कोटींच्या आसपास रक्कम आहे. स्टेट बॅँकेकडील १३६ कोटींमध्ये ६० कोटींच्या नोटा पाचशेच्या आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे मिळणार असले तरी अन्य बॅँकांकडे पाचशेच्या नोटा नाहीत.