धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा

By Admin | Updated: April 22, 2016 01:41 IST2016-04-22T01:35:05+5:302016-04-22T01:41:21+5:30

गिरीश महाजन : सिंचन शेतीकडे वळण्याचा सल्ला

Only 18 percent water stock in the dam | धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा

धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा

नाशिक : भविष्यात पाणीप्रश्न तीव्र होत जाणार असून, मराठवाड्याच्या धरणांमध्ये तर केवळ पावणेतीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच लातूरसारख्या मोठ्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. राज्यातील सर्व धरणांत मिळून केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
नाशिक येथे आयोजित खरीप हंगाम २०१६-१७च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. समुद्रातील पाणी पिण्यासाठी गोड करून वापरण्याचा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा प्रस्ताव चांगला असला तरी तो खूप खर्चिक आहे. त्याची लगेचच अंमलबजावणी करता येणे तूर्तास अशक्य आहे. त्याऐवजी मुंबईला कोयनेतून थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा करण्याबाबत सरकारने प्रयत्न सुरू केले असून, तसा प्रस्तावही तयार करण्यात येत आहे. ही योजना अस्तित्वात आल्यास मुंबईचा पाणीप्रश्न निकाली निघून वैतरणा धरणाचे पाणी नाशिकसह मराठवाड्यासाठी उपयोगात येणार आहे.
निसर्गचक्र दिवसेंदिवस अवघड होत चालले असून, शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे वळले पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचनचा पर्याय खूपच चांगला आहे. त्यामुळे एकूण वापरातील ७५ टक्के पाण्याची बचत तर होतेच, मात्र उत्पादनही चांगले येते. पीक विम्याचे निकष बदलल्यामुळे आता शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविण्यासाठी उत्साह दाखविला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Only 18 percent water stock in the dam