कांदाचाळ अनुदान खात्यावर जमा होणार
By Admin | Updated: January 12, 2016 22:43 IST2016-01-12T22:42:33+5:302016-01-12T22:43:28+5:30
पगार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल

कांदाचाळ अनुदान खात्यावर जमा होणार
कळवण : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान त्वरित मिळावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान येत्या महिनाभरात मिळणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी सांगितले.
तीन महिन्यांपूर्वी पणन संचालक कार्यालय, नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘कांदा-भाकरी’ आंदोलन करून पणन संचालक सुभाष नागरे यांना घेराव घातला होता. वरिष्ठांशी चर्चा करून पुढील दोन महिन्यात अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. या मागणीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार व जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी सतत पाठपुरावा केला.
अखेर या आंदोलनास यश मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ कोटी १९ लाखांचे अनुदान जमा होणार आहे, तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी ११ लाखांचे अनुदान जमा होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)