बुधवारपासून कांदा लिलाव सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:12 IST2018-04-02T00:12:13+5:302018-04-02T00:12:13+5:30
वणी : वर्षभराच्या कांदा खरेदी- विक्रीच्या व्यवहाराचा आर्थिक लेखाजोखा मिळविण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून बंद ठेवण्यात आलेले कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार ४ एप्रिलपासून पूर्ववत सुरू ठेवण्यात येणार आहेत.

बुधवारपासून कांदा लिलाव सुरू होणार
वणी : वर्षभराच्या कांदा खरेदी- विक्रीच्या व्यवहाराचा आर्थिक लेखाजोखा मिळविण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून बंद ठेवण्यात आलेले कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार ४ एप्रिलपासून पूर्ववत सुरू ठेवण्यात येणार आहेत. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजारातील व्यवहार नमूद कारणामुळे तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे वणी-सापुतारा रस्त्यावरील उपबाजारात शुकशुकाट जाणवत होता. त्यामुळे आर्थिक उलाढालीवर त्याचा परिणाम जाणवत होता. दरम्यान, येत्या ४ एप्रिलपासून कांदा खरेदी-विक्री प्रणाली सुरू होणार आहे. सध्या उन्हाळ कांद्याची मोठी आवक होण्याचा कालावधी आहे. व्यापारीवर्ग मुक्त हस्ताने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदीची भूमिका घेतात. कारण या कांद्याची साठवणक्षमता व टिकाऊपणा या जमेच्या बाजू आहेत. त्याप्रमाणात घाऊक मागणी असल्याने दर्जेदार व मोठ्या आकाराच्या कांद्याला ग्राहक पसंती देतात. हे गणित व्यापाऱ्यांबरोबर उत्पादकांनाही माहिती असते. त्यानुसार उत्पादकही विक्री धोरण निश्चित करतात. दरम्यान, बुधवारी कांदा उत्पादकांनी कांदा विक्रीसाठी आणण्याचे आवाहन दिंडोरी कृषी उत्पन बाजार समिती सभापती दतात्रय पाटील व कांदा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष मनीष बोरा यांनी केले आहे. वणी उपबाजारात दिंडोरी, चांदवड, कळवण, देवळा तालुक्यातून कांदा उत्पादक कांदा विक्रीसाठी आणतात. प्रतिदिन किमान दहा हजार क्विंटल आवक होते. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. परराज्याबरोबर परदेशात कांदा विक्रीसाठी व्यापारी पाठवितात. कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारप्रणालीवर पेट्रोल पंप, हॉटेल, खते, औषध दुकाने व इतर तत्सम व्यवसायाची उलाढाल अवलंबून असते.