फ्रंटलाइन वर्कर्सपैकी एक लाखावर कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:26+5:302021-07-22T04:10:26+5:30
नाशिक : जिल्ह्यात गत महिन्यापासून लसीकरणाला काही प्रमाणात वेग देण्यात आला असला तरी अद्यापही फ्रंटलाइन वर्कर्सपैकी सुमारे एक लाखाहून ...

फ्रंटलाइन वर्कर्सपैकी एक लाखावर कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस प्रलंबित
नाशिक : जिल्ह्यात गत महिन्यापासून लसीकरणाला काही प्रमाणात वेग देण्यात आला असला तरी अद्यापही फ्रंटलाइन वर्कर्सपैकी सुमारे एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही, म्हणजे दुसऱ्या डोसबाबत त्यांची अनास्था दिसून आल्याचेच अधोरेखित झाले आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाकडूनच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत आरोग्य कर्मचारी आणि अन्य फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपैकी १ लाख ७५ हजार २६२ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ७२ हजार ५८२ इतकी आहे. ‘फ्रंटलाइन वर्कर्स’मध्ये पहिल्या डोसचे प्रमाण ९६ टक्के असले, तरी दुसरा डोस घेणारे कर्मचारी ४१ टक्केच आहेत. त्यामुळे आरोग्य तसेच ‘फ्रंटलाइन वर्कर्स’नी तातडीने लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना आरोग्य सचिवांनी यंत्रणेला दिल्या आहेत. देशामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एकूण लसीकरणामध्ये महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे. आरोग्य कर्मचारी सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आजाराच्या संसर्गापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांचे लसीकरण होण्याची आवश्यकता आहे.
इन्फो
दुसऱ्या डोसबाबत अनुत्सुक
पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यास कर्मचारी फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळेच दुसरा डोस पूर्ण न केल्याने लसीकरण रखडल्याचे वरकरणी दिसत आहे.
शहरातील बूथनिहाय आणि ग्रामीण भागात गावनिहाय यादी तयार करून त्यातील दुसरा डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करावे आणि त्यांना दुसरा डोस घेण्यास प्रवृत्त करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.
कोट
सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत भीती वाटत होती. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी वेग घेतला. त्यामुळे दुसरा डोसदेखील कर्मचाऱ्यांनी घेणे अपेक्षित होते; पण ज्यांनी घेतलेला नसेल, त्यांना दुसरा डोस घेण्यास प्रेरित केले जाईल.
डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
----------------
ही डमी आहे.