स्कॉर्पिओच्या धडकेत एकजण ठार,चालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 17:01 IST2017-09-07T17:00:44+5:302017-09-07T17:01:18+5:30

स्कॉर्पिओच्या धडकेत एकजण ठार,चालक फरार
नाशिक : ओझर येथील कंपनीतून रात्री कामाहून घराकडे परतताना आडगाव शिवारातील मेडिकल फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. काल बुधवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
रुपेश सुभाष भावसार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कलानगर, म्हाडा कॉलनीतील रहिवासी होते. ते ओझर येथील डीटीएल कंपनीत कामाला होते. बुधवारी रात्री ते सुटी झाल्याने स्प्लेंडरवरून ( एमएच १५, सीएक्स ३२०९) आडगाव मेडिकल फाटा रस्त्याने दिंडोरीरोडकडे जात असताना भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ (एमएच १५, बीएन ८५९५) या वाहनाने जबर धडक दिली. या धडकेने भावसार हे रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर स्कॉर्पिओ वाहनाच्या चालकाने वाहन सोडून पलायन केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.