चांदवड : तालुक्यातील मुंबई -आग्रा रोडवर मालसाणे शिवारात नमोकार तीर्थाजवळ सोमवारी (दि.८) पहाटे चांदवडकडून नाशिककडे जाणारी होंडा अॅमेज कार (क्र. एमएच ०४/१२२१) उलटल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.मालसाणे व सोग्रसजवळ झालेल्या या अपघातात देवेंद्र मोहन व्यास (२७) हा तरुण ठार झाला.घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. डी. आहिरे हे घटनास्थळी गेले व पंचनामा केला. याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. देवेंद्र व्यास याचे वडील चांदवड प्रांत अधिकाऱ्यांच्या गाडीवर चालक होते. त्यांचाही काही वर्षांपूर्वी असाच अपघाती मृत्यू झाला होता. देवेंद्र हा त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर लागण्याच्या प्रक्रियेत अंतिम टप्प्यात असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. देवेंद्र याच्या पश्चात आई व एक विवाहित बहीण आहे. व्यास कुटुंबावर कोसळलेल्या या आघातामुळे चांदवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मालसाणे शिवारात अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:07 IST