चौपदरीकरणासाठी एकतर्फी ताबा?
By Admin | Updated: December 3, 2014 01:41 IST2014-12-03T01:41:25+5:302014-12-03T01:41:59+5:30
नाशिक-सिन्नर महामार्ग : पाइपलाइनचे स्थलांतर सुरू

चौपदरीकरणासाठी एकतर्फी ताबा?
नाशिक : निवाडा जाहीर होऊन जमिनीचा मोबदला निश्चित, लवादाकडे अपिलेही दाखल, न्यायालयाने स्थगिती उठवलेली तरीही शेतकऱ्यांकडून अडवणूक होत असल्याने नाशिक-सिन्नर चौपदरीकरणासाठी भूसंपादन कायद्यान्वये पोलिसांच्या मदतीने एकतर्फी जमिनीचा ताबा घेण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खाते व महसूल विभाग चाचपडून पाहत असून, त्याचाच एक भाग म्हणून काही ठिकाणी कामालाही सुरुवात झाली आहे. नाशिक-सिन्नर चौपदरीकरणात भूसंपादनाचा मोठा अडथळा निर्माण झाला असून, मुंबई उच्च न्यायालयानेही चौपदरीकरणाची गरज लक्षात घेता, भूसंपादनावरील स्थगिती उठवून मार्ग मोकळा केला आहे. अशा परिस्थितीत भूसंपादन अधिकाऱ्यांनी निवाडा जाहीर करून मोबदल्याची रक्कमही निश्चित केली आहे. शासनाने मोबदला वाढवून द्यावा यासाठी लवादाकडे जाण्याची तरतूद असल्याने लवादही नेमण्यात येऊन त्याच्या सुनावण्या सुरू आहेत. भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांनी निवाडा घोषित केल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचा मोबदला घ्यावा किंवा लवादाकडे अपील केले असले तरी, संबंधित यंत्रणा जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करू शकते; परंतु सिन्नरच्या प्रकरणात महसूल व सार्वजनिक बांधकाम खात्याने आस्ते कदम घेत, शेतकऱ्यांचे मन वळविण्यास प्राधान्य देत बैठका घेऊन आवाहन केले आहे; मात्र त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळत नाही. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारची बैठक स्थानिक आमदाराच्या उपस्थितीत घेण्यात आली असता, त्यातून कोणताच तोडगा निघालेला नाही. परिणामी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम खात्याने वृत्तपत्रांत जाहिरात देऊन शेतकऱ्यांना जमिनीचा ताबा देण्याचे जाहीर आवाहन केले आहे.