वनविभाग लावणार एक कोटी रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:33 AM2019-07-01T00:33:59+5:302019-07-01T00:34:17+5:30

राज्य शासनाच्या वन मंत्रालयाकडून राज्यभरात वनविभागाच्या सर्व फोरम व अन्य शासकीय, निमशासकीय आस्थापनांद्वारे ३३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमाला सोमवारी (दि.१) प्रारंभ केला जाणार आहे.

 One crore seedlings for the forest department | वनविभाग लावणार एक कोटी रोपे

वनविभाग लावणार एक कोटी रोपे

googlenewsNext

नाशिक : राज्य शासनाच्या वन मंत्रालयाकडून राज्यभरात वनविभागाच्या सर्व फोरम व अन्य शासकीय, निमशासकीय आस्थापनांद्वारे ३३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमाला सोमवारी (दि.१) प्रारंभ केला जाणार आहे. याअंतर्गत वनविभागाच्यानाशिक वनवृत्तासाठी एक कोटी २७ लाख रोपे लागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांना एकूण सुमारे एक कोटी ९२ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.
राज्यातील वनजमिनी व वनइतर जमिनींचे क्षेत्र वृक्षाच्छदनाखाली आणण्यासाठी २०१६ सालापासून राज्य सरकारने ५० कोटी रोपे लागवडीचे अभियान अर्थात ‘वनमहोत्सव’ सुरू केला आहे. या अभियानाचे हे अखेरचे वर्ष असून, यावर्षी ३३ कोटी रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ वन मंत्रालयाकडून संपूर्ण राज्यभरासाठी निश्चित करण्यात आले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर असा कालावधी या अभियानाचा ठरविण्यात आला आहे. पावसाळ्यात वृक्षलागवड, संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने जनसामन्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि रोपे लागवडीची चळवळ व्यापक बनावी, हा यामागील उद्देश असल्याचे नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी सांगितले.
नाशिक पश्चिम विभागाकडून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले या गावी वनजमिनीवर १५ हेक्टर जागेत सुमारे साडेसोळा हजार रोपे लावण्यात येणार आहे. या ठिकाणाहून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
जिल्हाभरात सर्व ग्रामपंचायतींनाही त्यांच्या हद्दीत रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मिळून सुमारे ४४ लाख २४ हजार रोपे लावायची आहेत. त्यांना प्रत्येकी तीन हजार २०० रोपांचे कमाल उद्दिष्ट्य पूर्ण करावयाचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून प्रत्येक ग्रामपंचायतीला रोपे मोफत पुरविली जाणार आहेत.
वर्षनिहाय जिवंत रोपे अशी...
जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून वनमहोत्सवांतर्गत रोपांची लागवड केली जात आहे. पहिल्या वर्षी (२०१६) २९.६९ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २९ लाख ५० हजार रोपांची लागवड झाली. त्यामध्ये ६८ टक्के रोपे जगल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. २०१७ साली २०.३ लाखांचे उद्दिष्ट दिले गेले होते. त्यापैकी ४३ लाख ४३ हजार रोपे लागवड झाली. त्यामध्ये ८१ टक्के रोपे जिवंत असून तिसऱ्या वर्षी ७२.२६ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करताना ७५ लाख ९१ हजार रोपे लागवड केली गेली. त्यापैकी ८७ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा वन-महसूल प्रशासनाने केला आहे. लागवड करण्यात आलेल्या रोपांमध्ये जिवंत राहिलेल्या रोपांची नोंद आॅक्टोबर व मे महिन्यात करण्यात येते. ही आकडेवारी आॅनलाइन पद्धतीने संनियंत्रित केली जाते.
२ कोटी २७ लाख रोपे तयार
जिल्ह्याला १ कोटी ९२ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी १ कोटी २७ लाख रोपे वनविभागाला लावायची आहेत. उर्वरित ६५ लाखांपैकी ४४ लाख रोपे ग्रामपंचायती मिळून आणि २१ लाख रोपे अन्य शासकीय, निमशासकीय संस्थांना मिळून लावायची आहेत. त्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळाच्या जिल्ह्यातील ७३ रोपवाटिकांमध्ये सुमारे २ कोटी २७ लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये काही रोपे १८ तर काही १० महिने तसेच काही ६ महिन्यांची आहेत. रोपनिर्मितीची प्रक्रिया मागील वर्षभरापासून सुरू होती. या सर्व रोपवाटिकांमधून ग्रामपंचायतींना मोफत तर अन्य शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांना वनमहोत्सवानिमित्त सवलतीच्या दरात रोपे पुरविली जाणार आहेत.
पूर्व विभागाला २८, तर पश्चिमला २६ लाखांचे टार्गेट
वनविभाग पूर्वला २८ लाख, तर पश्चिमला २६ लाख रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. या दोन्ही विभागांकडून त्यांच्या आठ ते नऊ वनपरिक्षेत्रांमध्ये वनजमिनीवर रोपांची लागवड केली जाणार आहे. जुलैअखेर रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न राहणार असल्याचे फुले म्हणाले. यासाठी प्रत्येक वनपरिक्षेत्र अधिकाºयावर जबाबदारी निश्चित केली गेली आहे.

Web Title:  One crore seedlings for the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.