निकम खून प्रकरणी एकास अटक
By Admin | Updated: May 20, 2017 02:11 IST2017-05-20T02:11:14+5:302017-05-20T02:11:23+5:30
पंचवटी : माजी नगरसेवक चंद्रकांत निकम यांचा पुतण्या किरण राहुल निकम (२९) याच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे

निकम खून प्रकरणी एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : पंचवटीतील माजी नगरसेवक चंद्रकांत निकम यांचा पुतण्या किरण राहुल निकम (२९) याच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी रात्री उशिरा एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या हत्येप्रकरणी
म्हसरूळ येथे राहणारा मयताचा मावसभाऊ नितीन पगारे याने दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात सात ते आठ मारेकऱ्यांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल गुरुवारी (दि. १८) पेठरोडवरील शनिमंदिराच्या पाठीमागील नवनाथनगर येथे भरवस्तीत निकम याच्यावर मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. पगारे याने दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री दहा वाजता पगारे परिसरातून दुचाकीवरून जात असताना नवनाथनगर येथे संशयित आरोपी संतोष उघडे, संतोष पगारे यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या निकम याची दुचाकी अडविली व तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत थांबविले.
निकम त्याठिकाणी थांबला असता काही क्षणातच पेठरोड परिसरात राहणारे संशयित आरोपी गणेश उघडे, बंडू मुर्तडक व त्यांचे इतर साथीदार त्याठिकाणी आले व त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून हातातील धारदार शस्त्राने निकम याच्या डोक्यावर, छातीवर, तोंडावर सपासप वार केले. वर्मी घाव बसल्याने निकम हा घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व जागीच मयत झाला. त्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळाहून पलायन केले.
मयत निकम ज्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याठिकाणी पोलिसांना एक जिवंत काडतूस मिळाले आहे. निकम याच्या हत्येनंतर नवनाथनगर परिसरात तणावाचे वातावरण असून, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.