Olympian Dattu Bhokanal finally married 'Kabul'; Conditional bail from the court | ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळने अखेर विवाह केला ‘कबुल’; न्यायालयाकडून सशर्त जामीन
ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळने अखेर विवाह केला ‘कबुल’; न्यायालयाकडून सशर्त जामीन

ठळक मुद्दे १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन पोलीस पत्नीने छळ व फसवणूकीची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती

नाशिक : ‘ऑलिम्पिक'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोइंगपटू दत्तू भोकनळविरूध्द त्याच्या पोलीस पत्नीने छळ व फसवणूकीची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश एन.जी.गिमेकर यांच्या न्यायालयात बुधवारी (दि.२९) सुनावणी झाली. दरम्यान, न्यायलयाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने तडजोडसाठी दिलेल्या वेळेत दत्तू व त्याची पत्नी आशा दोघांचे वकील यांच्यात समझौता होऊन दत्तूने विवाह न्यायलयात मान्य केला.
नाशिक ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या आशा दत्तू भोकनळ यांनी १६ तारखेला त्यांचे पती दत्तूविरूध्द फसवणूक व छळ केल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात केली होती. आशा यांनी फिर्यादीत दत्तू यांच्यासोबत २२ डिसेंबर २०१७ साली खेड तालुक्यातील आळंदी येथे जय अंबे मंगल कार्यालयात हिंदू धर्म वैदिक पध्दतीने विवाह दोघांच्या सहमतीने केल्याचे म्हटले होते. ३ फेबु्रवारी २०१९ रोजी दत्तू यांनी आशा यांच्या आडगाव येथील घरी येऊन ९ फेब्रुवारी रोजी गावाकडे पुन्हा लग्न करायचे ठरविले व दोघांनी कुटुंबियांना माहिती दिली. चांदवडमधील एक लॉन्स १० हजार रूपये आगाऊ देऊन आशा यांच्या कुटुंबीयांनी नोंदविले; मात्र ७ फेब्रुवारी रोजी दत्तू यांनी फोनवरून लग्न करणार नसल्याचे कळविल्याचे फिर्यादीत आशा यांनी म्हटले होते. १३ व १४ तारखेला दत्तू यांनी पुन्हा घरी येऊन वाद घालत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले होते. पुन्हा २४ तारखेला संगमनेर येथे एका लॉन्समध्ये लग्न करण्याचे त्यांनी मान्य केले आणि आशा यांच्या वडिलांनी संगमनेर येथे जाऊन लॉन्स बूक केले व लग्नाची पुन्हा तयारी केली. पुन्हा दत्तू याने फोनवरून लग्नास येण्यास नकार दिला. त्यामुळे आशा भोकनळ यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून १६ मे रोजी दत्तूविरोधात फिर्याद दिली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुरू झाली. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दत्तू व आशा यांना तडजोडीसाठी वेळ दिला. यादरम्यान, दत्तूचे वकील अ‍ॅड. चार्वाक कांबळे तर आशा भोकनळ यांच्याकडून अ‍ॅड.अर्चना शर्मा यांनी आपआपसांत तडजोड केली. न्यायालयापुढे सहा वाजता पुन्हा सुनावणी होऊन दत्तूने विवाह मान्य केला. न्यायालयाने अटी व शर्तीच्या अधिन राहून दत्तूला जामीन दिला.


 


Web Title: Olympian Dattu Bhokanal finally married 'Kabul'; Conditional bail from the court
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.