ओझर ग्रामपालिकेची धडक वसुली मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 21:24 IST2020-10-30T21:23:48+5:302020-10-30T21:24:23+5:30
ओझर : येथील ग्रामपालिका मालकीच्या जागेवर भाडेतत्त्वावर असलेल्या काही व्यावसायिक गाळेधारकांवर वाढलेल्या थकबाकीमुळे प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसले. थकबाकीमुळे ग्रामपालिका ...

ओझर ग्रामपालिकेची धडक वसुली मोहीम
ओझर : येथील ग्रामपालिका मालकीच्या जागेवर भाडेतत्त्वावर असलेल्या काही व्यावसायिक गाळेधारकांवर वाढलेल्या थकबाकीमुळे प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसले. थकबाकीमुळे ग्रामपालिका अनेक वर्षांपासून काही गाळेधारकांना वसुली करण्याचा तगादा लावत होती. त्यात अनेकांनी येऊन ती भरली. शेवटी उरलेल्या ३७ गाळेधारकांना ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या. त्यास २९ जणांनी सकारात्मक प्रतिसाद देत थकबाकी जमा केली. उरलेल्या आठ जणांवर गुरुवारी सकाळी देवकर यांनी आपला मोबाइल बंद करून कर्मचाऱ्यांसोबत घेऊन कारवाई करायला सुरुवात केली. त्यात मटण मार्केट येथील पाच, प्रियदर्शनी येथील एक, तर खंडेराव मंदिराजवळील दोन अशा आठ गाळ्यांना सील केले. याप्रसंगी काही भाडेकरूंची प्रशासनाबरोबर बाचाबाची झाली. देवकर यांनी ठाम पवित्रा घेतल्याने सील झालेल्या दुकानदारांनी एकूण चार लाख दहा हजार रुपये भरले. नंतर सगळ्यांची दुकाने उघडण्यात आली. यासर्व प्रकरणी दुपारनंतर ओझर शहरात एकच चर्चा घडली. या कारवाईत दिलीप ठुबे ,संतोष सोनवणे ,योगेश गोरे, तुकाराम गवळी, सतीश सोनवणे, योगेश गोरे यांच्यासह ग्रामपालिका कर्मचारी सहभागी झाले होते.
----
मार्च एण्डला कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर ग्रामपालिकेची आर्थिक स्थिती त्यावेळी केलेल्या उपाययोजनामुळे काहीशी बिघडली. आज उत्पन्नाचे स्रोत कर असताना अनेक लोक ते भरण्यास टाळाटाळ केली होती. काही दिवसांत पाणी आणि घरपट्टी वसुलीसाठीदेखील अशीच वसुली मोहीम हाती घेणार आहे.
-दत्तात्रय देवकर, ग्रामविकास अधिकारी,ओझर