अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
By Admin | Updated: February 28, 2017 01:49 IST2017-02-28T01:49:37+5:302017-02-28T01:49:58+5:30
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
नाशिक : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात प्रगती होत असून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ व निफाड यांसारख्या तालुक्यांमध्ये अप्रगत शाळांमध्ये वाढ होत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शासनाकडून विविध प्रयत्न करूनही त्यात सुधारणा होत नसल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी केंद्रप्रमुख व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
रावसाहेब थोरात सभागृहात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विभागीय शिक्षण परिषद पार पडली. याप्रसंगी आयुक्त बोलत होते. व्यासपीठावर प्राथमिक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार यांच्यासह शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आदि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धीरजकुमार म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी राज्यात विविध उपक्र म राबविले जात असतानाही बहुतांश शाळांमध्ये सुधारणा दिसून येत नाही. त्यासाठी शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही होत स्वत: उपक्रमशील होणे गरजेचे आहे.
राज्यातील १९ हजार शाळा या डिजिटल झाल्या असून, अन्य शाळाही डिजिटल होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावरून जिल्हा पातळीवरील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या कर्तव्यनिष्ठेने पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच बीट, केंद्र, जिल्हा तसेच राज्य पातळीवर एखाद्या विद्यार्थ्यास लिहिता, वाचता न आल्यास त्याची जबाबदारीही संबंधित विभागाने घेणे गरजेचे असून, राज्यातील सर्व शाळा या शंभर टक्के प्रगत होणे आवश्यक असल्याचेही मत धीरजकुमार यांनी व्यक्त केले. दरम्यान, बीट, केंद्रावर दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित असताना बहुतांश शिक्षक, तसेच काही अधिकारी शिक्षणाच्या दर्जापेक्षा बदलीचे अधिक अर्ज घेऊन येतात. त्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित केल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत तसेच देशाच्या प्रगतीत हातभार लागेल, असे सांगतानाच प्रशस्त भागात बदली मागणाऱ्या शिक्षकांची यावेळी त्यांना कानउघाडणी केली. (प्रतिनिधी)