अर्पण रक्तपेढीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: September 11, 2016 01:59 IST2016-09-11T01:58:50+5:302016-09-11T01:59:02+5:30
अर्पण रक्तपेढीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

अर्पण रक्तपेढीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नाशिक : आंतरराष्ट्रीय रक्तसंक्रमण संस्थेच्या वतीने दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अर्पण रक्तपेढीला हॅरोल्ड गन्सन फेलोशिप पुरस्काराने गौरविण्यात आले. रक्तपेढीचे डॉ. शशिकांत पाटील यांनी संस्थेचे अध्यक्ष रवि रेड्डी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
दुबईत दि. ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी भारतातून पाच संशोधकांची निवड करण्यात आली होती. त्यात अर्पण रक्तपेढीचे डॉ. शशिकांत पाटील यांचा समावेश होता. अर्पण रक्तपेढीत ८० टक्के पेक्षा जास्त नियमित रक्तदान करणारे रक्तदाते आहेत. नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे रक्त हे अतिसुरक्षित असते व त्या रक्तपिशव्यांमध्ये रक्तसंक्रमणामुळे होणाऱ्या एचआयव्ही, कावीळ, बी आणि सी यांचे प्रमाण अतिशय नगण्य असते, हे सिद्ध झाले आहे. तसेच नियमित नॅट टेस्टेड रक्त पुरवठा केल्यामुळे वारंवार रक्ताची गरज असणाऱ्या रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमियापीडित रुग्णांना सुदृढ ठेवण्यात यश आले आहे. नॅट टेस्टेड रक्त हे अतिसुरक्षित असते हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. या संशोधनात गेल्या पाच वर्षांपासून नियमित रक्तदान करणाऱ्या १ लाख २० हजार ६७ रक्तदात्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी अर्पण रक्तपेढीला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.