शिक्षक, शिक्षकेतरांच्या २० टक्के अनुदानात शालार्थ आयडीचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:09+5:302021-08-20T04:19:09+5:30
नाशिक : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयातील संच मान्यतेतील मंजूर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के ...

शिक्षक, शिक्षकेतरांच्या २० टक्के अनुदानात शालार्थ आयडीचा अडसर
नाशिक : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयातील संच मान्यतेतील मंजूर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाने संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सुखावले असले तरी त्यांच्या ऑनलाईन वेतनासाठी लागणारा शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी शासनाकडून विविध अटींचा अडसर तयार केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे करण्यात आला आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या २० टक्के अनुदानासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवासातत्य, नियुक्तीपूर्वीची बिंदुनामावली, पदनिर्मितीचे कारण, जात पडताळणी, पदभरती वेळची कागदपत्रे यासह अन्य विविध त्रुटींचा सामना करावा लागत असून, त्यामुळे ऑनलाईन वेतनासाठी आवश्यक असलेला शालार्थ आयडी मिळण्यात अडचण येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान, शासन त्रुटी समिती तसेच वेळोवेळी झालेल्या मूल्यांकनाअंती तुकड्यांवरील कार्यरत शिक्षकांना वेतन सुरू झाले असून, शालार्थसाठी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपूर्वीची बिंदुनामावली सादर करण्याच्या त्रुटीचा समावेश केला आहे. संबंधितांनी अद्ययावत बिंदुनामावली तसेच प्राथमिक तपासणी झालेली बिंदुनामावली सादर केलेली असल्याने ही त्रुटी निकाली काढण्यात यावी. तसेच सर्व शिक्षकांची पदे ही नवीन शाळातुकडी मंजुरी व संच मान्यतेतील पदमंजुरीने रूजू / भरती केलेली असताना शासनाने दाखविलेले पदनिर्मितीचे कारण ही त्रुटीही निकाली काढावी, अशी मागणी शिक्षक महासंघाने या निवेदनातून केली आहे.