हृदयविकारात आदिवासी मुलांचे प्रमाण अधिक

By Admin | Updated: April 30, 2015 00:01 IST2015-04-30T00:01:24+5:302015-04-30T00:01:40+5:30

कुपोषणाचे बळी : वैद्यकीय उपचारांच्या जागृतीचाही अभाव

The number of tribal children in the heart | हृदयविकारात आदिवासी मुलांचे प्रमाण अधिक

हृदयविकारात आदिवासी मुलांचे प्रमाण अधिक

संकेत शुक्ल ल्ल नाशिक
विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर असणारे आदिवासी आणि त्यांची मुले केवळ कुपोषणाचेच बळी ठरतात असे नसून जनजागृतीचा अभाव आणि त्यामुळे आलेल्या अज्ञानामुळे त्यांना स्वत:च्या आरोग्याचेही भान राहत नाही. परिणामी अनेक आजारांना बळी पडण्याचे प्रमाण आदिवासी बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे उघड झाले आहे.
आदिवासी भागात मुलांमध्ये असलेले कुपोषण हा नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरतो. त्यावर उपाययोजना म्हणून केवळ पौष्टिक खाद्य देऊन त्यांचा आरोग्यस्तर वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. शासनाच्या या प्रयत्नांत अंगणवाडी सेविकांचा सहभाग मोलाचा असला, तरी केवळ पौष्टिक खाद्य देऊन हा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुळात बालकांचा जन्म सुदृढ व्हावा यासाठी शहरात जितकी काळजी घेतली जाते तितकी ग्रामीण भागात आणि विशेषत: आदिवासी भागात घेतली जात नाही. त्यातच दारिद्र्य आणि दुष्काळ या दुहेरी संकटात सापडलेल्या बहुतांश आदिवासी समाजातील गरोदर स्त्रियांना पुरेसे पोषक अन्न न मिळाल्याचा परिणाम म्हणून आदिवासी भागातील बालके मोठ्या प्रमाणात विविध आजारांना बळी पडत असल्याचे दिसून आले आहे.
हृदयाला असलेल्या विविध आजारांसंदर्भात हृदयविकारतज्ज्ञ मनोज चोपडा यांनी आदिवासीबहुल ग्रामीण भागात केलेल्या पाहणीदरम्यान त्यांना ही गोष्ट आढळली आहे. मागील वर्षभरात त्यांनी नंदुरबार, तळोदा, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, हिंगोली, परभणी यांसह विविध ग्रामीण भागात केलेल्या पाहणीत हृदयाचा आजार असलेली सुमारे ३५० मुले सापडली. त्या मुलांमध्ये हृदयाच्या दोन कप्प्यांमधील छिद्र (ए.एस.डी.), हृदयाच्या दोन मोठ्या कप्प्यांमधील छिद्र (व्ही.एस.डी.), दोन महारोहिणीं-मधील छिद्र (पी.डी.ए.), डाव्या किंवा उजव्या बाजूची झडप बंद अशी अनेक मुले आढळली.
त्या मुलांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील ७८ मुलांच्या हृदयाला छिद्र आढळले. त्या मुलांवर डॉ. चोपडा यांनी उपचार केले. आज ती मुले ठणठणीत आहेत. साधारणत: मुलांच्या विविध अवयवांची वाढ ही गर्भावस्थेतच होत असते. एक टक्का मुलांमध्ये पुरेशी वाढ न झाल्याने हा प्रश्न उद्भवतो. शहरापेक्षा ग्रामीण भागात आणि त्यातही आदिवासी कुटुंबांमध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्यांच्यातील दारिद्र्य आणि दुसरे म्हणजे अज्ञान. विविध औषधांच्या माध्यमातून बाळाचा विकास चांगला होऊ शकतो; परंतु त्याचे ज्ञान नसल्याने गर्भवती स्त्रियांना पौष्टिक अन्न आणि उपचार मिळत नाहीत. त्यामुळे गर्भाची वाढ अपरिपक्वरीत्या होते. आदिवासी समाजात असलेले अनेक समजही त्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळेच आदिवासी मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असते. ते टाळण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.
- डॉ. मनोज चोपडा, हृदयविकारतज्ज्ञ

Web Title: The number of tribal children in the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.