शहरातील बाधित संख्या पाचशेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:06 IST2020-06-09T22:27:03+5:302020-06-10T00:06:36+5:30
नाशिक : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, जुन्या नाशकातील नाईकवाडी पुरा हा तर हॉटस्पॉट झाला आहे. या भागात सुमारे २५ बाधित आढळले आहेत, तर मंगळवारी (दि.९) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २२ झाली आहे. तर दिवसभरात २१ बाधित आढळल्याने शहरातील रुग्णसंख्या ४८० झाली आहे.

शहरात गेल्या आठ दिवसांपासून शहरात रोजच कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहेच, परंतु मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. शहरात सोमवारी (दि.८) पंचवटीतील नाईकवाडी पुरा येथील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या वृद्धाला रविवारी (दि.७) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. जुन्या नाशिकमधील नाईकवाडी पुरा परिसर हॉटस्पॉट झाला असून, याठिकाणी सुमारे पंचवीस रुग्ण आत्तापर्यंत सापडले आहेत. जुन्या नाशिकमधील अमरधामरोड येथे एक, कादरी चौक येथे एक, आझाद चौक येथे तसेच बागवानपुरा येथे ३० वर्षीय व्यक्तीलादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नाग चौकातदेखील दोन जणांना संसर्ग झाला आहे.
टाकळीरोड येथे ५१ वर्षांचा इसम, तर सरदार चौकात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे पंचवटीत फुलेनगर परिसरात दोन, द्वारकावरील काठेमळा परिसरात दोन, टाकळीरोडवर चक्रधर कॉलनी परिसरात एक तर अन्यत्र दोन, सातपूर कॉलनीत दोन, जयदीपनगर
येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
----------------------------
वडाळा परिसराला दिलासा
गेल्या दोन दिवसांत वडाळा भागात एकही नवीन रुग्ण आढळला नसून त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे टाकळीरोड, जुने नाशिकसह काही भागांत रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे.