साथरोग काळासाठी वैद्यकीय विद्यार्थी व्हावेत तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:16 IST2021-06-09T18:11:55+5:302021-06-09T18:16:12+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्ययावत करण्यासाठी विभागनिहाय बैठकांना प्रारंभ झाला असून बुधवारी (दि.९) मुंबई विभागाकरीता ऑनलाईन बैठक पार पडली . प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बैठकीत वैद्यकीय शिक्षणासाठीच्या अनेक नाविन्यपुर्ण सूचना समोर आल्या.

साथरोग काळासाठी वैद्यकीय विद्यार्थी व्हावेत तयार
नाशिक: जागतिक दर्जाचे आरोग्य शिक्षण देतांनाच विद्यार्थ्यांना साथरोग काळात वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे नियोजन करावे तसेच आरोग्य शिक्षणासाठी टिचर्स बँकेची संकल्पना आखण्यात यावी अशा महत्वपुर्ण सुचना आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बृहत आराखडा बैठकीत करण्यात आल्या.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्ययावत करण्यासाठी विभागनिहाय बैठकांना प्रारंभ झाला असून बुधवारी (दि.९) मुंबई विभागाकरीता ऑनलाईन बैठक पार पडली . प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बैठकीत वैद्यकीय शिक्षणासाठीच्या अनेक नाविन्यपुर्ण सूचना समोर आल्या. विद्यापीठाचा सन २०२२ ते २०२७ करीता तयार करण्यात येणारा बृहत आराखडा सर्वसमावेशक असावा यासाठी सहभागी मान्यवरांनी ऑनलाईन बैठकीत महत्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीस कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. अजित गोपछडे, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, डॉ. कविता पोळ, डॉ. अभय पाटकर, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, आरोग्य क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, महाविद्यालयांचे अधिष्ठाता व प्राचार्य ऑनलाईन उपस्थित होते.
डॉ. करमाळकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा बृहत आराखडा समृध्द असावा यासाठी भविष्यात आरोग्य शिक्षणाचे महत्व व गरज लक्षात घेऊन त्यात योग्य बदल करणे गरजेचे आहे. आरोग्य शिक्षणाबरोबर संवाद कौशल्य महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शैक्षणिक क्षेत्रात केल्यास भरीव कामगिरी करता येणे शक्य असून यासाठी संशोधन प्रकल्पांचे महत्व अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक पध्दतीने विचार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
माजी कुलगुरु डॉ. मृदुला फडके यांनी आरोग्य शाखेतील शिक्षकांची टिचर्स बँक तयार केल्यास महाविद्यालयांना नक्कीच त्याचा उपयोग होईल. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे तसेच साथरोग काळात कार्य करण्यासाठी विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले पाहिजे अशी सुचना केली. अभ्यासक्रमात आरोग्य क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश असणे गरजेचे असल्याचाही मुद्या त्यांनी उपस्थित केला.
नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठीची सुलभ प्रक्रिया, ग्रामीण भागात रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उपाययोजना, संशोधन प्रकल्प, ई-जर्नल, शिक्षकांकरीता कार्यशाळा, साथरोग काळात सर्वांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन प्रणाली आदीबाबत सहभागी मान्यवरांनी ऑनलाईन बैठकीत चर्चा केली.
बैठकीस विद्यापीठाचे माजी प्रति-कुलगुरु डॉ. शेखर राजदरेकर, डॉ. गौतम सेन, डॉ. प्रफुल्ल केळकर, डॉ. वर्षा फडके, डॉ. अपर्णा संखे, डॉ. सुचेता दांडेकर, डॉ. मिलिंद नाडकर, डॉ. श्रध्दा फडके, डॉ. काझी, डॉ. मौला डिसुझा, डॉ. प्रणाली थूल, श्री. संजय पत्तीवार, डॉ. संदीप काळे, डॉ. अनुपमा ओक, डॉ. सुचिता सावंत, डॉ. पारिजात दमानिया आदी मान्यवर उपस्थित होते. या ऑनलाईन बैठकीचे समन्वयन विद्यापीठ नियोजन विभागाचे प्र. संचालक डॉ. राजीव आहेर यांनी केले.