एनएसडीच्या नभांगणातही चमकणार ‘हंडाभर चांदण्या’
By Admin | Updated: October 25, 2016 01:28 IST2016-10-25T01:28:01+5:302016-10-25T01:28:25+5:30
महोत्सवासाठी निवड : फेब्रुवारीत दिल्लीत प्रयोग

एनएसडीच्या नभांगणातही चमकणार ‘हंडाभर चांदण्या’
नाशिक : दुष्काळाच्या दाहकतेवर टोकदार भाष्य करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या नाशिकच्या ‘हंडाभर चांदण्या’ या प्रायोगिक नाटकाची दखल थेट राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एनएसडीने घेतली असून, फेबु्रवारी २०१७ मध्ये दिल्लीत होणाऱ्या भारत रंग महोत्सवासाठी निवड केली आहे. देश-विदेशांतील ६९ नाटकांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव प्रायोगिक नाटकाचा महोत्सवात समावेश आहे.
नाटकाचे निर्माते व सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत आनंदवार्ता दिली. यावेळी नाटकाचे लेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांच्यासह नाटकातील सर्व कलावंत उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी सांगितले, एक वर्षापूर्वी ‘हंडाभर चांदण्या’ हे प्रायोगिक नाटक रंगभूमीवर आले. संस्थेने आजवर केलेल्या १६ प्रयोगांच्या माध्यमातून जमा झालेला निधी महाराष्ट्रातील दुष्काळी व आदिवासी भागातील गावांसाठी जलाभियनाकरिता दिला आहे. या अभियानांतर्गत पाच गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही उत्स्फूर्तपणे गौरविले जात असलेल्या ‘हंडाभर चांदण्या’ची दखल आता दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने घेतलेली आहे. एनएसडीमार्फत दि. १ ते २१ फेबु्रवारी २०१७ दरम्यान आशिया खंडातील सर्वांत मोठा नाट्योत्सव भरवला जाणार असून, त्यात ५ फेब्रुवारीला ‘हंडाभर चांदण्या’चा प्रयोग होणार आहे. प्रश्नांचे बिऱ्हाड पाठीवर घेत जगणं सहज करून घेणाऱ्या ग्रामीण भागातील हुंकार आता देशातील राजधानीत उमटणार असून, नाशिकच्या रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रायोगिक नाटकाला दिल्ली दरबारी स्थान मिळाले असल्याचे लेखक दत्ता पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)