...अब क्यो आयेंगे नासिक कुंभमेला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 23:17 IST2015-08-30T23:16:15+5:302015-08-30T23:17:36+5:30
परराज्यांतील भाविकांचा सवाल : पोलिसी अतिरेकीपणामुळे द्वितीय-तृतीय कुंभपर्वणीच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

...अब क्यो आयेंगे नासिक कुंभमेला ?
नाशिक : ‘लग रहा है मानवता का मेला, आओ नासिक कुंभमेला’ असे आवाहन करत देशभर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ब्रँडिंगवर कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या जिल्हा प्रशासनाभोवती आता असंख्य प्रश्नांचे मोहोळ घोंगावत असून, पहिल्या कुंभपर्वणीला पोलिसी अतिरेकीपणामुळे प्रचंड मनस्ताप सहन कराव्या लागणाऱ्या परराज्यातील भाविकांच्या मुखातून आता ‘हो गया मानवता का झमेला, अब क्यो आयेंगे नासिक कुंभमेला’ असे संतप्त भाव व्यक्त होताना दिसून येत आहेत. अनुभवशून्य अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचा जबर फटका पहिल्या कुंभपर्वणीला भाविकांना बसल्याने त्याची दुष्कीर्ती जगभर जाऊन पोहोचली असून, त्याचा परिणाम दि. १३ आणि १८ सप्टेंबरला होणाऱ्या शाहीपर्वणीला भाविकांच्या उपस्थितीवर जाणवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एरव्ही आपल्या हक्कांसाठी बहिष्काराचे अस्त्र उगारणाऱ्या साधू-महंतांकडूनही भाविकांच्या श्रद्धेचा तसूभरही विचार न झाल्याने साधू आणि भाविक यांच्यातील आत्मभावाचे नाटकही यानिमित्ताने विंगेतून बाहेर आले आहे.
शनिवार, दि. २९ आॅगस्टला झालेल्या पहिल्या शाही पर्वणीच्या दिवशी संपूर्ण शहराला बॅरिकेडिंगच्या माध्यमातून करकचून आवळणाऱ्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने कुंभमेळ्याचा मूळ आत्मा असलेल्या भाविकांनाच त्यापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. स्थानिक नागरिकांची घरातच कोंडी करत आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांनाही १५-२० कि.मी. पायपीट करायला लावत प्रचंड मनस्ताप देणाऱ्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाविरुद्ध आता सर्वस्तरातून निषेधाचा सूर उमटू लागला आहे. शाही पर्वणीच्या आदल्या आणि नंतरच्या दिवशी सलग तीन दिवस शहरातील रस्ते वाहतुकीला बंद करण्याच्या ‘बाळबोध’ नियोजनाचा धसका स्थानिक नाशिककरांनी घेतला आणि त्यांनी दिवसभर घराबाहेर न पडणेच पसंत केले.