आता स्मशानभूमीतही जागा मिळेना; अंत्यविधीसाठी प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:15 IST2021-04-07T04:15:15+5:302021-04-07T04:15:15+5:30
नाशिक शहरात यापूर्वी गेल्या वर्षी साधारणत: सप्टेंबर महिन्यात अशी स्थिती ओढावली होती आताही तीच अवस्था होत आहे. नाशिक हे ...

आता स्मशानभूमीतही जागा मिळेना; अंत्यविधीसाठी प्रतीक्षा
नाशिक शहरात यापूर्वी गेल्या वर्षी साधारणत: सप्टेंबर महिन्यात अशी स्थिती ओढावली होती आताही तीच अवस्था होत आहे. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे महत्त्वाचे ठिकाण असून, साहजिकच नाशिकमध्ये ग्रामीण भागातील आणि धुळे, जळगाव, नंदुरबार येथून कोरोनाबाधितांना त्यांचे नातेवाईक दाखल करतात. याशिवाय नाशिक शहरातील बाधितदेखील येथेच दाखल होत असल्याने बाधितांचा मृत्यू झाला, की नाशिक अमरधामवरच ताण वाढतो. सामान्यत: कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी विद्युत किंवा गॅस, डिझेल शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यातच संसर्ग टाळण्यासाठी नागरिक आता मृत झालेल्या आप्तेष्टाला रुग्णालयातून थेट अमरधाममध्येच नेत असल्याने याठिकाणी वेटिंगला सामोरे जावे लागत आहे. नाशिक शहरात नाशिक आणि पंचवटी अमरधाम अशा दोन महत्त्वाच्या स्मशानभूमी असून, त्यापैकी विद्युत व डिझेल शवदाहिनी नाशिक अमरधाममध्ये आहे. त्यामुळे तेथेच ताण अधिक आहे. तसेच याठिकाणी पारंपरिक १४ स्मशान बेड आहेत. आता विद्युतदाहिनी उपलब्ध न झाल्यास पारंपरिक पद्धतीनेदेखील अंत्यसंस्कार करण्याची मुभा महापालिकेने दिली आहे. परंतु नाशिक अमरधाममध्ये इतका ताण वाढतो आहे की, पारंपरिक बेड नव्हे तर गोदाकाठी असलेल्या स्मशानभूमीच्या भागातच पण रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.
..इन्फो...
पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात रांगा
१ नाशिक शहरातील महापालिकेच्या सहाही विभागात जन्म-मृत्यू विभाग आहे. सध्या शहरात मृत्यूचा दर वाढल्याने नागरिकांना अर्ज करण्यासाठी पालिकेच्या विभागीय कार्यालयात जावे लागत आहे, त्यामुळे ताण वाढला आहे.
२ महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कर्मचाऱ्यांकडे आता कोरोनासंदर्भातील कामे असून, अन्य नियमित कामांचा ताण असल्याने मृत्यूचे प्रमाणपत्र लवकर मिळत नाही.
३ सेवा हमी कायद्यानुसार तीन दिवसात दाखला देणे बंधनकारक आहे. मात्र, रुग्णाचा ज्या रुग्णालयात मृत्यू झाला, तेथून आणि अमरधाममधून नोंद आली नाही असे कारण दिले जाते त्यामुळे कमीत कमी पंधरा दिवसाच्या आत तर दाखले मिळतच नाही.
इन्फो...
दररोज पंचवीस ते तीस जणांवर अंत्यसंस्कार
नाशिक शहरात दररोज पंधरा ते वीस रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यात कोविड आणि नॉनकोविड अशी वर्गवारी केली तरी त्यासाठी नाशिक अमरधाममध्ये सतरा बेड असले तरी विद्युत दाहिनीवर ताण अधिक आहे. त्यामुळे त्याठिकाणी वेटिंग करावीच लागते.
अमरधामच्या परिसरात गोदाकाठी अंत्यसंस्कार करणे बेकायदेशीर असूनही तेथे ते केले जातात. तसेच पारंपरिक बेडची गरज असल्याने नातेवाइकांना राख सावडण्यासाठी दुसऱ्या दिवशी बोलवण्याऐवजी सायंकाळीच या असा निरोपदेखील पाठवला जात आहे.
(ही डमी आहे.)