आता पालिकेत स्वतंत्र सेल
By Admin | Updated: May 8, 2016 23:15 IST2016-05-08T23:10:06+5:302016-05-08T23:15:23+5:30
पालिकेचे धोरण : वाहतूक, गोदावरी, स्मार्ट सिटीसाठी विशेष विभाग

आता पालिकेत स्वतंत्र सेल
नाशिक : महापालिकेशी संबंधित विविध जबाबदाऱ्यांचे वहन द्रुतगतीने व्हावे यासाठी विषयानुरूप स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले आहे. शहर वाहतुकीपासून विकास आराखड्याच्या अंमलबजावणीपर्यंत आणि गोदावरी संवर्धनापासून मुकणे धरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र सेल सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनेच अधिकारी आणि अभियंत्यांच्या बदलीचे नियोजन करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ही माहिती दिली. शहर आणि महापालिकेचे कामकाज करताना त्यासाठी सर्व कामे त्याच त्या अधिकाऱ्यांकडून करवून घेताना अन्य जबाबदाऱ्यांमुळे अडचणी येतात. त्यामुळे त्या त्या विषयांना न्याय मिळत नाही, अशी अवस्था आहे. त्या पार्श्वभूमीवर आता काही महत्त्वाच्या विषयांसाठी स्वतंत्र सेल सुरू करण्यात येणार आहे. शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने वाहतूक सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतुकीच्या समस्यांवर कायमस्वरूपी लक्ष ठेवून नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अभियंते नियुक्त केले जातील. ज्यांच्याकडे केवळ याच विभागाचे काम असेल अतिरिक्त जबाबदारी नसेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. अशाच प्रकारे शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठीदेखील सेल असणार आहे. सध्या नगररचना विभागात विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यापेक्षा बांधकाम परवानग्या देणाऱ्यावरच भर दिला जातो. त्यामुळे वीस वर्षांपूर्वीच्या मंजूर आराखड्यातील आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी आजही कामे सुरूच आहेत. तसे होऊ नये आणि नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर किमान रस्ते तातडीने ताब्यात घेता यावे, यासाठी सेलची निर्मिती करण्यात येणार आहे. मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना ही २६० कोटी रुपयांची आहे. महापालिकेला दरवर्षी अंदाजपत्रकात भांडवली कामांसाठी जितका निधी मिळतो, तितक्या रकमेची ही योजना असल्याने स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. अशाच प्रकारे नदीसंवर्धनासाठीही विभाग सुरू होणार आहे.