... now patriotism will become stronger in Kashmir | ...आता काश्मीरमध्ये देशभक्ती होईल बळकट

...आता काश्मीरमध्ये देशभक्ती होईल बळकट

ठळक मुद्देअरुणकुमार : ३७० हटविल्याने भारतीय संविधानाचा काश्मीर प्रवेश

नाशिक : कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले विशेषाधिकार हे केवळ कागदोपत्री होते. भारताचे ते आविभाज्य अंग असूनदेखील नसल्यासारखे होते. त्या राज्याचा स्वतंत्र राष्टÑध्वज होता, यामुळे भारताविषयीचे प्रेम तेथील जनतेत वृद्धिंगत होण्यास अडथळा निर्माण होत होता. कलम ३७० हटविण्यात आल्याने भारतीय देशप्रेम, राष्टÑभक्तीची भावना काश्मीरमध्ये अधिक बळकट होईल आणि भारतासोबत काश्मीरच्या भविष्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होण्यास मदत होईल, असा आशावाद जम्मू-काश्मीर अभ्यास केंद्राचे संचालक अरुणकुमार यांनी व्यक्त केला.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला मिलिटरी कॉलेज संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने रविवारी (दि.१५) गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख : ५ आॅगस्ट २०१९ पूर्वी आणि नंतर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अरुणकुमार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल तथा सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय शेकटकर, कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कॅप्टन डॉ. श्रीपाद नरवणे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी अरुणकुमार म्हणाले, काश्मीरच्या संघर्षात मागील ७२ वर्षांमध्ये अनेक शूरवीरांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यामुळे काश्मीर भारताच्या नकाशात टिकून आहे. काश्मीरचे महत्त्व लडाख, पाकव्याप्त काश्मीर आणि चीन व्याप्त प्रदेशामुळे अधिक आहे. कलम ३७० हा काश्मीरच्या विकासमार्गातील आणि तेथील जनतेला त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी मोठा अडसर होता, असेही अरुणकुमार यावेळी म्हणाले.
व्यवस्था सुधारणार
जम्मू-काश्मीरमध्ये ७२ वर्षांत ढासळलेली व्यवस्था सुधारण्याचा मार्ग ५ आॅगस्ट २०१९ नंतर या सरकारने खुला केला. त्यामुळे आता भविष्यात काश्मीरमध्ये वाईट काही नाही, तर चांगलेच घडणार असून तेथील जनतेच्या मनात आत्मविश्वास वाढीस लागून भारताविषयीची अस्मिता अधिक मजबूत होईल, असे अरुणकुमार यावेळी म्हणाले. कोणत्याही राष्टÑाची उभारणी व निर्मिती ही देशप्रेमाच्या भावनेने होत असते, हे आपण विसरून चालणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: ... now patriotism will become stronger in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.