बांधकामांना मिळणार आता आॅनलाइन परवानग्या
By Admin | Updated: November 24, 2014 00:32 IST2014-11-24T00:31:53+5:302014-11-24T00:32:24+5:30
बांधकामांना मिळणार आता आॅनलाइन परवानग्या

बांधकामांना मिळणार आता आॅनलाइन परवानग्या
नाशिक : शहरातील बांधकामांच्या परवानग्यांना होणारा उशीर आणि इतर महापालिकांच्या तुलनेत होणारा वेळकाढूपणा लक्षात घेता महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बांधकाम व्यावसायिकांना घरबसल्या परवानग्या मिळतील अशी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना नगररचना विगाभाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महापालिका हद्दीतील बांधकामाच्या परवानग्या सुलभ होण्यासाठी राज्यातील इतर महापालिकांच्या धर्तीवर आॅटो डीसीआर सॉफ्टवेअर वापरून व्यावसायिकांना घरबसल्या परवानगीच्या नस्ती आणि दाखल्यापर्यंतची सर्व कामे संगणकाच्या माध्यमातून करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. पालिकेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्तांनी सर्व विभागांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्या अंतर्गत प्रथम नगरविकास विभागाचा आढावा घेताना आयुक्तांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात विभागाबद्दल विभागाचे सहसंचालक विनय शेंडे यांनी सर्व कामाची माहिती आयुक्तांना दिली.
आयुक्तांनी टीडीआर, एसएफआय आणि लेआउट तसेच विविध परवानग्यांची पद्धत याविषयी जाणून घेतले. राज्यातील जवळपास सर्वच महापालिकांमध्ये आॅनलाइन काम होत असताना, नाशिकमध्ये मात्र प्रत्यक्ष आल्यानंतरच काम होत असल्याने आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त करीत लवकरच या विभागातही आॅनलाइन पद्धतीने काम करण्याची सूचना केली. त्यासाठी आॅटो डीसीआर सॉफ्टवेअर सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे परवानग्यांसाठी व्यावसायिकांचा जाणारा वेळ आणि या कामात पारदर्शकतेचा असणारा अभाव दूर हेऊन कामात सुटसुटीतपणा येईल, असे आयुक्त म्हणाले.
नगररचना विभागाकडून फायलींचा विलंबाने होणारा प्रवास त्यामुळे थांबेल. आॅनलाइन नोंदणी करताना बांधकामाचा नकाशा, नियमानुसार सोडलेली जागा या बाबी सॉफ्टवेअरमध्ये नमूद केल्यानंतर त्याची आपोआप छाननी होणार आहे. त्यानंतर नगररचना विभागाकडून आॅनलाइन पद्धतीनेच परवानगी मिळणार आहे. दरम्यान, आयुक्तांनी नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)